दिनांक 24 February 2020 वेळ 7:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » परतीच्या पावसाने फिरवला मतदार; मतदानाचा टक्का वधारणार

परतीच्या पावसाने फिरवला मतदार; मतदानाचा टक्का वधारणार

  • उमेदवारांच्या जीवात जीव

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 18 : जव्हार मोखाडा तालुक्यातील बहुतांश मजूर वर्ग हा दरवर्षी आवणी व कापणीच्या कामासाठी बाहेरगावी स्थलांतरित होत असतो. त्यातच यंदा नरेगाची कामे देखील सुरु न झाल्याने मोठ्या प्रमाणावर येथील मजूर स्थलांतरित झाला होता. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता व हा हक्काचा मतदार परत आणायची चिंता उमेदवारांना भेडसावत होती. परंतू वरूणराजा ऐनवेळी उमेदवारांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र असुन असंख्य मजूर वर्ग स्वगृही परतला आहे. त्यामुळे उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. असे असले तरी मतदानासाठी घराबाहेर पडण्यासाठी मतदारांची मनधरणी मात्र उमेदवारांना करावी लागणार आहे.

जव्हार -मोखाडा हे तालुके आदिवासी बहुल लोकवस्ती व बहुसंख्य मजूर वस्तीचे आहेत. त्यामुळे या भागातुन वाडा, विक्रमगड, शहापूर, मुरबाड आणि कल्याणमधील ग्रामीण भागात रोजगारानिमित्त जाणार्‍या मजुरांच्या स्थलांतरणाचे प्रमाण हजारोंच्या पटीत असते. नरेगाची कामे उपलब्ध झाल्यास स्थलांतरणाचे हे प्रमाण काही प्रमाणात कमी असते. त्यानुसार 2 ऑक्टोबरनंतर नरेगाची कामे सुरु होणे अपेक्षित होते. मात्र निवडणुकांची धामधूम आणि रोहयो यंत्रणांच्या चुकारपणामुळे कामे सुरु न झाल्याने येथील मजूरांना रोजगारासाठी इतरत्र स्थलांतर करणे भाग पडले. त्यातच निवडणुकीची तारीख आणि कापणीचा हंगाम एकत्रच आल्यामुळे विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील सर्वच जिल्हा परिषद गटातुन हजारोंच्या संख्येने मतदानाचा टक्का घसरणार असल्याचे भाकीत स्थानिक नेत्यांकडून वर्तवले जात होते व हे मतदान सहज काबीज करता येण्यासारखे असल्याने सर्वच उमेदवारांचे धाबे दणाणले होते.

मतदार गेला गावाला, चैन पडेना उमेदवराला
मतदार गेला गावाला, चैन पडेना उमेदवाराला अशीच काहीशी परिस्थिती ऐन निवडणुकीच्या तोंडावर विक्रमगड विधानसभेत उद्भवली होती आणि अशा प्रकारे स्थलांतरित झालेला मतदार राजा माघारी परतवायचा कसा? असा यक्ष प्रश्न सर्वच उमेदवारांना भेडसावत होता. मात्र ऐनवेळी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने आवणी व कापणीची कामे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. परिणामी या कामांसाठी जिल्ह्यातील विविध भागात स्थलांतरीत झालेला मजूर वर्ग आपले विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर घेऊन स्वगृही परतला आहे. ऐनवेळी पावसाने हात दिलेला असला तरी जव्हार-मोखाडा तालुक्यातील स्थलांतराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असुन संभाव्य आमदाराला स्थानिक मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यायोगे सातत्याने होणारे कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी स्थलांतराचे आव्हान समर्थपणे पेलावे लागणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top