पालघर जिल्ह्यात कोण वरचढ?

0
79

राजतंत्र मीडिया (दि. १८) : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीतून पालघर जिल्ह्यावर कोण राज्य करणार ते स्पष्ट होणार आहे. सध्या जिल्ह्यातील 3 मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. भाजपकडे 2 व शिवसेनेकडे 1 मतदारसंघ आहे. बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या बोईसर व नालासोपारा मतदारसंघातून लोकसभा निवडणूकीत भाजप सेना युतीला मताधिक्य मिळाल्यामुळे बविआ 3 मतदारसंघ स्वतःकडे राखेल का? डहाणू मतदारसंघात मोदी लाट असताना विरोधकांनी भाजपवर मताधिक्य मिळवल्यामुळे हा मतदारसंघ भाजप राखणार की लाल बावटा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप व सेनेने युती केलेली आहे. राज्यात मोठ्या भावाच्या भुमीकेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने लहान भाऊ शिवसेनेला युतीच्या जागा वाटपात पालघर जिल्ह्यातील 6 पैकी 4 मतदारसंघ दिले असले तरी जिल्ह्यात नेमका मोठा भाऊ कोण हे सांगता येणे अवघड ठरले आहे. दोन भावांनी फायदे तोटे लक्षात घेऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या पुढच्या पुढीची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. जिल्ह्यात खासदार भाजपचा, 2 आमदार भाजपचे व जिल्हा परिषद भाजपकडे असताना भाजपने लोकसभेची जागा युतीच्या तहात शिवसेनेला दिली व पुन्हा विधानसभेच्या 6 पैकी 4 जागा शिवसेनेला दिल्या आहेत. असे असले तरी त्यानंतरही आपणच मोठे भाऊ राहू, अशी भाजपने व्यूहरचना केलेली असू शकते.

खरे तर 2014 च्या निवडणूका भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे लढविल्यानंतर दोघांची जिल्ह्यातील ताकद स्पष्ट झाली होती. त्यावेळी जिल्ह्यातून भाजपचे डहाणू व विक्रमगड मतदारसंघातून अनुक्रमे पास्कल धनारे व विष्णू सवरा निवडून आले. सद्यस्थितीत मतदारसंघात झालेल्या दुर्लक्षामुळे आणि भाजपच्या अंतर्गत बंडखोरीतून अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणूकीत या दोन्ही मतदारसंघातून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आघाडी मिळाल्यामुळे हे मतदारसंघ डेंजर झोनमध्ये गेले आहेत. ते सेफ झोनमध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या.

2014 पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे कृष्णा घोडा निवडून आले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसमधून घोडा यांना आयात करुन काँग्रेसच्या राजेंद्र गावीत यांच्याकडून हा मतदारसंघ परत मिळवला होता. आज गावीत स्वतः शिवसेनेचे खासदार आहेत. हा मतदारसंघात आता शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला ठरल्याचे दिसत आहे.

उर्वरीत मतदारसंघाचा आढावा घेऊ या.

बोईसर : या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या विलास तरे यांनी 64 हजार 550 मते मिळवत शिवसेनेच्या कमळाकर दळवी यांचा पराभव केला होता. दळवी हे त्यावेळी शिवसेनेने आयात केलेले उमेदवार होते. त्यांना 51 हजार 677 मते मिळाली. भाजपाचे जगदीश धोडी हे 30 हजार 228 मते मिळवत तिसर्‍या क्रमांकावर राहिले. सेनेचे बंडखोर उमेदवार सुनील धानवा यांना चौथ्या क्रमांकाची 5 हजार 702 मते मिळाली. आता भाजपचे जगदीश धोडी हे शिवबंधनात अडकले असून ते कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. म्हणजे या मतदारसंघात शिवसेना मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट आहे. पुन्हा 2018 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराला बोईसर मतदारसंघातून सर्वाधिक 49 हजार 991 मते मिळाली होती. बविआच्या उमेदवाराला दुसर्‍या क्रमांकाची 46 हजार 754 मते मिळाली तर भाजप उमेदवाराला 41 हजार 632 मते मिळाली होती. बोईसर मतदारसंघ खात्रीने काबीज करण्यासाठी शिवसेनेने सरळ बविआचा आमदारच आयात केला. विलास तरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. परंतु भाजपचे संतोष जनाठे यांनी बंडखोरी करुन शिवसेनेच्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे. भाजपचे पदाधिकारी उघडपणे जनाठे यांचा प्रचार करीत असल्याने ही भाजपपुरस्कृत बंडखोरी असल्याचे संकेत आहेत.

वसई : 2014 मध्ये शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार विवेक पंडित यांना पराभूत करुन हितेंद्र ठाकूर यांनी हा मतदारसंघ खेचून घेतला. 2018 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत देखील बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला येथून सर्वाधिक 64 हजार 478 मते, भाजप उमेदवाराला दुसर्‍या क्रमांकाची 31 हजार 611 व शिवसेनेला तिसर्‍या क्रमांकाची 21 हजार 555 मते मिळाली. बविआ उमेदवाराला भाजप व सेना उमेदवाराच्या एकत्रित मतांपेक्षा जास्त मते होती. 2019 मध्ये पुन्हा या मतदारसंघातून बविआ आघाडीवर राहिली. येथून भाजपने 2018 मध्ये शिवसेनेपेक्षा जास्त मते मिळवली असली तरी हा मतदारसंघ जिंकून आणणे म्हणजे दगडावरची शेती असल्याचे समजून शिवसेनेच्या जागांची संख्या वाढवण्यासाठी तो शिवसेनेला दिल्याचे उघड आहे.

नालासोपारा : या मतदारसंघातून बविआचे क्षितिज ठाकूर यांनी 1 लक्ष 13 हजार 566 मते मिळवून भाजपच्या राजन नाईक यांचा पराभव केला होता. नाईक यांना 59 हजार 67 मते मिळाली होती. शिवसेनेच्या शिरीष चव्हाण यांना तिसर्‍या क्रमांकाची 40 हजार 321 मते मिळाली. पुन्हा 2018 च्या लोकसभा निवडणूकीत बविआच्या उमेदवाराला येथून सर्वाधिक मते मिळाली व दुसर्‍या क्रमांकावर भाजप राहिली तर सेना तिसर्‍या क्रमांकावर राहिली. भाजप सेनेच्या एकत्रित मतांपेक्षा बविआची मते अधिक होती. 2019 च्या निवडणूकीत मात्र या मतदारसंघातून सेना भाजप उमेदवाराने तब्बल 25 हजार 535 अधिक घेतली आहेत. त्यामुळे युतीच्या हा मतदारसंघ मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या मतदारसंघातून भाजप हा सेनेचा मोठा भाऊ ठरलेला असताना भाजपने हा मतदारसंघ सेनेला दिला आहे. त्यामुळे एरवी बहुजन विकास आघाडीच्या दावणीला बांधली जाणारी सेना येथे मनापासून मैदानात उतरेल. शिवसेनेकडे प्रदीप शर्मा हा उमेदवार देखील पाठवला. शर्मा यांची पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याने भाजपला ते ओझे उचलायचे नव्हते. त्यांची फाईल मुख्यमंत्र्यांकडेच राहणार असल्याने उमेदवार शिवसेनेचा असला तरी भाजपला नियंत्रण ठेवण्यात अडचण उरणार नाही. हा सर्व विचार करुन भाजपने मतदारसंघ सेनेला दिल्याचे उघड आहे.

Print Friendly, PDF & Email

comments