दिनांक 24 February 2020 वेळ 7:43 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » सिंचनाच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करणार

सिंचनाच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करणार

जव्हार येथील सभेत मुख्यमंत्र्याचे आश्वासन

प्रतिनिधी/जव्हार, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी शासनाने मागील 5 वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचतानाच येत्या काळात स्थानिक ठिकाणीच शेतीतून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून या भागात छोटे-छोटे बंधारे बांधुन सिंचनाच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जव्हार येथे केले. ते आज, गुरुवारी विक्रमगड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचार सभेसाठी जव्हारला आले होते.

जव्हार येथील राजीव गांधी स्टेडीअम येथे आयोजित करण्यात आलेल्या या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या पंधरा वर्षात तुम्ही काय विकास केला तो दाखवा, नाहीतर आम्ही पाच वर्षात किती विकास केला तो दाखवतो, असे खुले आव्हान त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिले आहे. आदिवासी विकासाचे स्वतंत्र बजेट आहे, ते आघाडी सरकारच्या काळात पुर्ण खर्च केले जात नव्हते. मात्र, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी त्यांच्या कार्यकाळात संपुर्ण निधी खर्च करून आदिवासींचा विकास साधला असल्याचे सांगत फडणवीस यांनी विष्णू सवरांच्या कार्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच जव्हार नगरपरिषदेच्या शताब्दी महोत्सवाला मी आलो होतो, त्यावेळी दिलेली सर्व आश्वासने पुर्ण केली आहेत. तर पुढील तीन महिन्यात उर्वरित सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.

कुपोषण निर्मुलनासाठी पायलट प्रोजेक्ट
या भागातील कुपोषणाला अमृत आहार योजनेमुळे आळा बसला आहे. मात्र, कुपोषण समुळ नष्ट करण्यासाठी नव्याने आदिवासी कुटुंबांना दोन किलो तूरडाळ व एक लीटर रिफाईन्ड खाद्यतेल मोफत देण्याची योजना या भागात प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली आहे. येथे ही योजना यशस्वी झाल्यास संपुर्ण महाराष्ट्रात ती सुरू करणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेसाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी माझ्याकडे पाठपुरावा केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.

दरम्यान, पाच वर्षात या भागात तीन वेळा येणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे, असे सांगतानाच या भागाचा आणि जव्हारचा पर्यटनातुन विकास करण्यासाठी मी प्रत्येक वर्षी येथे येणारच, अशी ग्वाही फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.

या प्रचार सभेस पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, बाबजी काठोळे, प्रकाश निकम, प्रल्हाद कदम, संतोष चोथे, हरिश्चद भोये, सुरेखा थेतले, मधुकर खुताडे आदींसह भाजप, सेना, आरपीआय व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top