पालघर विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेसमोर विरोधकांचे आव्हान उभे ठाकेल का?

0
92

निवडणूक वार्तापत्र (संजीव जोशी) : 130-पालघर हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या मतदार संघात 1 लाख 39 हजार 174 पुरुष, 1 लाख 34 हजार 803 महिला व इतर 17 असे 2 लाख 73 हजार 994 इतके मतदार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे अमित कृष्णा घोडा हे विद्यमान आमदार असून पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे. त्यांच्याऐवजी सेनेने श्रीनिवास चिंतामण वनगा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उमेश गोपाळ गोवारी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे योगेश शंकर नम, बहूजन समाज पार्टीतर्फे सुरेश गणेश जाधव, वंचित बहूजन आघाडीतर्फे विराज रामचंद्र गडग हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले सेनेचे अमित घोडा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले होते. त्यांनी बंडाचे निशाण फडकवित राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज देखील भरला होता. मात्र ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मन वळविले आणि घोडा यांनी माघार घेत पुन्हा हाती शिवबंधन बांधले. घोडा यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांना बळ मिळाले होते व चुरस निर्माण झाली होती.

मतदारसंघाची पार्श्वभूमी:

  • पालघर विधानसभा मतदारसंघ हा 1990 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तेव्हापासून 2009 चा अपवाद वगळता येथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे.
  • 1957 मध्ये बॉम्बे राज्यातील (गुजरातसह महाराष्ट्र) पालघर विधानसभा मतदारसंघातून संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे नवनीतभाई शहा यांनी विजय मिळवला होता.
  • 1962 मध्ये येथून काँग्रेसचे श्रीधर पाटील निवडून आले होते. त्यानंतर पालघर मतदारसंघाची पुनर्रचना झाली व भौगोलिक सीमा बदलली.
  • 1967 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे नवनीतभाई शहा यांनी काँग्रेसचा पराभव करीत पालघर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
    *1972 साली काँग्रेसचे विनायक पाटील यांनी नवनीतभाई शहांचा पराभव करीत पुन्हा हा मतदारसंघ काबीज केला. त्यानंतर पुन्हा एकदा मतदारसंघाची पुनर्रचना झाली व मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला.
  • 1977 च्या आणीबाणीनंतर झालेल्या निवडणूकीत येथून जनता पार्टीतर्फे अर्जुन शिंगाडे यांनी विजय मिळवला.
  • 1980 मध्ये काँग्रेसचे विष्णू वळवी यांनी येथून विजय मिळवला व दरवर्षी वेगवेगळ्या पक्षांना आलटून पालटून सत्ता देण्याची पालघर मतदारसंघाची परंपरा मोडीत काढत 1985 मध्ये दुसर्‍यांदा विजय मिळवला.

1990 मध्ये मात्र शिवसेनेच्या बाजूने कौल लागला. उदयबंधू पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून येथून शिवसेना तळागाळात रुजली होती. येथून शिवसेनेचे अविनाश सुतार हे सामान्य शिवसैनिक निवडून आले. 1995 मध्ये शिवसेनेने उमेदवार बदलला व महिला शिवसैनिक मनिषा निमकर यांना उमेदवारी देण्यात आली. पुन्हा हा मतदारसंघ शिवसेनेनेच राखला. सर्व विरोधकांच्या एकत्रित मतांइतकी मते एकट्या शिवसेना उमेदवाराला मिळाली. निमकर यांना राज्यमंत्रीपदाची संधी देखील मिळाली. त्याचवेळी उदयबंधू आणि निमकर यांच्यात शीतयुद्ध सुरु झाले. 1999 मध्ये पुन्हा एकदा मनिषा निमकर निवडून आल्या. या कालावधीत पालघरमध्ये उदयबंधू व निमकर अशी दोन सत्ताकेंद्रे निर्माण झाली. 2004 च्या निवडणूकीत उदय बंधूंनी उमेदवार बदलण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यावेळी विलास तरे हे शिवसेनेतच होते व जिल्हा परिषद सदस्य होते. उमेदवारीसाठी त्यांच्या नावाचा पर्याय पुढे करण्यात आला होता. मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने पुन्हा एकदा निमकर यांनाच संधी दिली व त्यांनी हा मतदारसंघ सेनेकडे राखला.

2009 मध्ये पालघर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यामुळे मतदारसंघाची गणिते बदलली होती. डहाणू तालुक्यातील जंगलपट्टी व किनारपट्टी यांच्यासह बोईसर व सफाळेचा भाग वगळून नवा पालघर मतदारसंघ निर्माण झाला होता. उदयबंधू व निमकर यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. उदयबंधूंनी पालघर मतदारसंघातील डहाणू तालुक्यातील जंगलपट्टीत राहणारे ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शंकर नम यांच्यावर जाळे टाकले. नम हे प्रदीर्घकाळ सत्तेबाहेर फेकले गेले होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारी मागितली. मात्र उदयबंधू त्यांना उमेदवारी मिळवून देऊ शकले नाहीत. उदयबंधूंनी बंडाचे निशाण फडकावले आणि शंकर नम यांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले. धूर्त बहुजन विकास आघाडीने येथे उमेदवार न देता नम यांना रसद पुरवली. त्यातून येथे काँग्रेसचे राजेंद्र गावीत हे 55 हजार 665 मतांनी विजयी झाले. शिवसेनेच्या मनिषा निमकर यांना 34 हजार 694 मते मिळाली. शंकर नम यांनी 30 हजार 683 मते मिळवली.
सतत 4 निवडणूका शिवसेनेने स्वतःकडे राखलेल्या पालघर विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये शिवसेनेचा पराभव शिवसेनेनेच केला होता. याच कार्यकाळात उदय बंधू काँग्रेसमध्ये गेले. तिथे मन न रमल्याने पुन्हा शिवसेनेत परतले.

[highlight]2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डहाणू मतदारसंघातून 2009 मध्ये पराभूत झालेले माजी आमदार कृष्णा घोडा यांनी शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. पालघर मतदारसंघातील डहाणू परिसरातील उमेदवार दिल्यामुळे शिवसेनेचे गणित पुन्हा जुळून आले आणि सेना भाजप स्वतंत्र लढलेले असताना शिवसेनेचे कृष्णा घोडा 46 हजार 142 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांचा अवघ्या 515 मतांनी पराभव केला. गावीत यांना 45 हजार 627 मते मिळाली. भाजपच्या डॉ. प्रेमचंद गोंड यांना तिसर्‍या क्रमांकाची 34 हजार 149 मते मिळाली. दरम्यान शिवसेना सोडून बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणार्‍या मनिषा निमकर यांना चौथ्या क्रमांकाची अवघी 23 हजार 738 मते मिळाली.[/highlight]

वर्षभरातच शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाल्यामुळे झालेल्या 2016 च्या पोटनिवडणुकीत सेनेने त्यांचे पुत्र अमित घोडा यांना उमेदवारी दिली. मात्र या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार न देता पाठिंबा दिला. आणि अमित घोडा यांचा विजय सोपा झाला. अमित घोडा यांना 67 हजार 129 मते मिळाली. काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांना 48 हजार 181 मते मिळाली. बहुजन विकास आघाडीच्या मनिषा निमकर यांना 36 हजार 781 मते मिळाली.

सध्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे.

श्रीनिवास वनगा

2018 मध्ये खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने चिंतामण वणगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वणगांना उमेदवारी जाहीर केली नाही. यावर निर्णय होत असताना भाजप श्रीनिवास वणगांना उमेदवारी देणार नाही, असे संकेत मिळत होते. याचाच फायदा घेत शिवसेनेने त्यांना गळाला लावले आणि उमेदवारी जाहीर केली. भाजप डॉ. हेमंत सवरा यांच्या नावाचा विचार करीत होते. शिवसेनेने खेळलेल्या या डावावर मात करण्यासाठी भाजपने काँग्रेसमधून राजेंद्र गावीत यांना आयात केले. या निवडणूकीत मात्र पालघर विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र गावीत यांना 56 हजार 215 मते मिळाली. सेनेचे श्रीनिवास वणगा यांना 54 हजार 453 मते मिळाली. बहुजन विकास आघाडीच्या वाटेला अवघी 13 हजार 690 मते मिळाली. या निवडणूकीत सेना भाजपमधील कटूता वाढली. शिवसेनेने आपला 2019 साठी लोकसभा उमेदवार म्हणून श्रीनिवास वणगांचीच उमेदवारी जाहीर केली.

मात्र 2019 मध्ये चित्र वेगळेच झाले आहे. सेना भाजपमध्ये युती करताना आधीच उमेदवारी जाहीर केलेल्या श्रीनिवास वणगांचे काय करायचे? हा सेनेपुढे प्रश्न होता. त्यामुळे युतीच्या बोलणीत हा मतदारसंघ हट्ट करुन सेनेने आपल्याकडे मागून घेतला. भाजपने तो दिला. त्यानंतर सेनेला प्रश्न पडला, लोकसभा निवडणूकीत श्रीनिवास वणगांचा निभाव लागेल का? या प्रश्नाचे खात्रीलायक उत्तर न मिळाल्याने त्यांनी श्रीनिवास यांच्याकडून लोकसभा उमेदवारी नको, आधी विधानसभेचा अनुभव मिळावा अशी इच्छा व्यक्त करुन घेतली. मग भाजपने मतदारसंघाबरोबर उमेदवार देखील दिला. कन्यादान करावे त्या प्रमाणे गावीतांचे शिवसेनेला उमेदवारदान करण्यात आले. या निवडणूकीत सेना भाजप युतीचे उमेदवार गावीत यांना एकतर्फी 1 लाख 11 हजार 794 मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपचा पाठिंबा मिळवलेल्या बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना अवघी 51 हजार 693 मते मिळाली. पालघर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे संपूर्ण वर्चस्व निर्माण झाले.

2019 च्या विधानसभा निवडणूकीसाठी पालघर मतदारसंघ शिवसेनेसाठी सुरक्षित ठरला आहे. खासदार शिवसेनेचा असल्याने ताकदीत भर पडली आहे. शिवसेना देईल तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक होती. श्रीनिवास वणगांना विधानसभेमध्ये पाठवायच्या माध्यमांसमोर दिलेल्या शब्दांचे भूत शिवसेना नेत्यांच्या मानगुटीवर बसले होते. त्याचवेळी अमित घोडा यांची कामगिरी फारशी चमकदार ठरलेली नव्हती. श्रीनिवास वणगांना रिंगणात उतरवले आणि सेनेने घोडांचा पत्ता कापून त्यांचे संघटनेवरील ओझे उतरवले. त्याचवेळी श्रीनिवास वणगांना दिलेल्या शब्दांचा बोजा देखील उतरवला. शिवसेनेची पाचही बोटे तुपात आहेत. बहुजन विकास आघाडीने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन आघाडीधर्म पाळला आहे. सर्वच नवख्या उमेदवारांच्या या लढाईत खरे कौशल्य संघटनांचेच उरलेले आहे. विरोधकांची झेप किती उंच जाते हे लवकरच स्पष्ट होईल.

आमचा विजय उमेदवारी अर्ज भरल्याबरोबर निश्चित झाला आहे. आम्ही ही निवडणूक मताधिक्क्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी लढतो आहोत. शिवसेनेचा उमेदवार सर्व प्रतिस्पर्ध्यांचे डिपॉझीट जप्त करील. -राजेश शहा, शिवसेना जिल्हा प्रमुख

Print Friendly, PDF & Email

comments