विक्रमगड मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर

0
95

निवडणूक वार्तापत्र (संजीव जोशी) : [highlight]129-विक्रमगड हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या मतदार संघात 2 लाख 66 हजार 295 मतदार आहेत. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विष्णू सवरा हे विद्यमान आमदार असून त्यांनी साडेचार वर्षे आदिवासी विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी राजकीय निवृत्ती स्वीकारली असून येथून त्यांचे पुत्र व राजकीय वारसदार डॉ. हेमंत सवरा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष सुनिल चंद्रकांत भुसारा, सीपीआयतर्फे सुरेश भाऊ भोईर, बसपातर्फे संजय रघूनाथ घाटाळ, रेव्होलुशनरी मार्क्सिस्ट पार्टी ऑफ इंडियातर्फे कमा धर्मा टबाले, भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे मोहन बारकू गुहे, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडियातर्फे सखाराम बाळू भोईर, वंचित बहूजन आघाडीतर्फे संतोष रामदास वाघ, अ‍ॅड. प्रमोद येदू डोके (अपक्ष) व भालचंद्र नवसू मोरघा (अपक्ष) हे 10 उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत.[/highlight]

येथून सुरेखा विठ्ठल थेतले (माजी जिल्हा परिषद अध्यक्षा), हरिचंद्र सखाराम भोये व मधुकर धर्मा खुताडे या 3 भाजप बंडखोरांसह भास्कर लक्ष्मण बेंडगा, शिवराम धावजी गिरंधला, दिपक लहु महाकाळ या अपक्षांनी निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.

मतदारसंघाची पार्श्वभूमी:
विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा 2009 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. तत्पूर्वी जव्हार, मोखाडा व तलासरी या तालुक्यांचा मिळून जव्हार विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. हा जव्हार मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला ठरला होता. येथून 1972 मध्ये रामचंद्र भोये हे काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर मात्र 1977 मध्ये माकपचे बारक्या कुर्‍हाडा येथून विजयी झाले. त्यानंतर 1980, 1985 व 1990 मध्ये येथून माकपचे लहानू शिडवा कोम निवडून आले. 1995 व 1999 मध्ये येथून माकपचे रामजी वरठा निवडून आले. 2004 मध्ये येथून माकपचे राजाराम ओझरे निवडून आले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माकपचा तलासरी हा बालेकिल्ला जव्हारपासून विभक्त झाल्याने माकपची डहाणू व विक्रमगड या दोन्ही मतदारसंघातील ताकद क्षीण झाली.

2009 मध्ये चिंतामण वणगा लोकसभा निवडणूकीत पालघर मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी नव्याने अस्तित्वात आलेल्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते विजयी झाले. त्यांना 47 हजार 371 मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत भुसारा यांना 42 हजार 339 मते मिळाली, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रतन बुधर यांना अवघी 15 हजार 141 मते मिळाली होती.

2014 च्या लोकसभा निवडणूकीत वणगांना पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली व ते निवडूनही आले. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपने विष्णू सवरा यांना उमेदवारी दिली. सवरांच्या उमेदवारीमुळे स्थानिक इच्छुकांमध्ये अस्वस्थता व कुरबुरी सुरु झाल्या. या निवडणूकीत भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. विष्णू सवरा 40 हजार 201 मतांसह विजयी झाले. शिवसेनेचे प्रकाश निकम यांना 36 हजार 356, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील भुसारा यांना 32 हजार 53, बहुजन विकास आघाडीच्या रामचंद्र गोविंद यांना 18 हजार 85 व माकपचे रतन बुधर यांना 13 हजार 152 मते मिळाली होती.

सध्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे?
दरम्यान 2018 मध्ये खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजेंद्र गावीत यांना संधी देण्यात आली. विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून गावीत यांना सर्वाधिक 56 हजार 518 मते मिळाली. शिवसेनेच्या श्रीनिवास वणगा यांना 51 हजार 164 मते मिळाली. माकपच्या किरण राजा गहला यांना 16 हजार 109 मते, बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 13 हजार 297 तर काँग्रेसचे दामोदर शिंगाडा यांना अवघी 12 हजार 747 मते मिळाली.

संबंधित बातमी : डहाणू विधानसभा मतदारसंघ भाजप राखणार की गमावणार?

मात्र 2019 मध्ये चित्र बदललेले आहे. 2019 च्या 5 महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना सर्वाधिक 79 हजार 458 मते मिळाली होती. त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. शिवसेना भाजपा युतीचे राजेंद्र गावीत यांना येथून 73 हजार 704 मते (बळीराम जाधव यांच्यापेक्षा 5 हजार 754 कमी मते) मिळाली. (2018 च्या पोटनिवडणुकीत भाजप व शिवसेनेची एकत्रित मते 1 लक्ष 7 हजार 682 होती) या निवडणूकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपपेक्षा विरोधकांना 5 हजार 754 मते अधिक मिळाल्यामुळे हेच सुत्र विधानसभा निवडणूकीत कायम ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा यांना काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. तर भाजपला बंडखोरी शमविण्यात आलेले यश, शिवसेनेचे नाराज प्रकाश निकम यांना प्रचारात सामील करण्यात आलेले यश, विवेक पंडित व विश्वनाथ पाटील या दिग्गजांची मिळालेली साथ या भाजपच्या जमेच्या बाजू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विक्रमगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लढत असल्याचे चित्र आहे.
भाजपचे डॉ. हेमंत सवरा हे वैद्यकीय व्यावसायिक असून त्यांचे शिक्षण एमबीबीएस व ऑर्थोपेडीक्स सर्जरीची पदविका असे झालेले आहे. ते मतदारसंघातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 2 कोटी 25 लाख रुपयांची संपत्ती असून 79 लाख रुपयांचे दायीत्व आहे. त्यांच्यावर एकही फौजदारी गुन्हा दाखल नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले असून त्यांचा शेती व बिल्डींग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे 57 लाख रुपयांची संपत्ती असून 49 लाख रुपयांचे दायीत्व आहे. त्यांच्यावर 1 आचारसंहिता भंगाचा व 2 धनादेश न वटल्याबद्दलच्या केसेस दाखल आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments