डहाणू विधानसभा मतदारसंघ भाजप राखणार की गमावणार?

0
137

निवडणूक विशेष वृत्त (संजीव जोशी) / डहाणू, दि. 13 : 128-डहाणू हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या मतदार संघात 1 लाख 37 हजार 227 पुरुष, 1 लाख 34 हजार 838 महिला व अन्य 4 असे 2 लाख 72 हजार 69 इतके मतदार आहेत. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे पास्कल जान्या धनारे हे विद्यमान आमदार असून पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्यासह भारताचा कम्यूनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे विनोद भिवा निकोले, भाजपचे बंडखोर रमेश जानू मलावकर, बसपातर्फे राजेश रावजी दूमाडा, मनसेतर्फे सुनिल लहान्या ईभाड, भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे अ‍ॅड. प्रविण नवशा वळवी, बहूजन मूक्ती पार्टीतर्फे विजय काकड्या घोरखाना, वंचित बहूजन आघाडीतर्फे शिलानंद बिना काटेला, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियातर्फे संतोष किसन पागी आणि अपक्ष दामोदर शिराड रांधे असे एकूण 10 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या वैदेही विशाल वाढाण यांनी येथून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी माघार घेतली आहे.

मतदारसंघाची पार्श्वभूमी :
डहाणू विधानसभा मतदारसंघ हा 1977 चा अपवाद वगळता काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. येथून 1962 साली काँग्रेसचे शामराव पाटील हे बिगर आदिवासी आमदार निवडून आले होते. त्यानंतर हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्यामुळे 1967 साली येथून काँग्रेसतर्फे महादेव उर्फ भाई कडू आमदार झाले. 1972 साली भाई कडू पुन्हा निवडून आले. आणीबाणीनंतर आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेमध्ये डहाणू मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंकर चव्हाण यांनी भाई कडूंचा पराभव करुन हा मतदारसंघ मिळवला.

1980 च्या निवडणूकीत मात्र भाई कडूंनी विजय मिळवून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला. 1985 मध्ये भाई कडूंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे काँग्रेसने शंकर नम यांच्या रुपाने तरुण उमेदवाराला संधी दिली. शंकर नम या मतदारसंघातून 1985, 1990, 1995 असे सलग 3 वेळा विजयी झाले. 1993 मध्ये नम यांना उपमंत्रीपद व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची संधी मिळाली. शंकर नम यांनी 1998 मध्ये डहाणू लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली आणि 1996 मध्ये भाजपच्या ताब्यात गेलेला लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवला. डहाणू विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेवर 1998 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे कृष्णा घोडा विजयी झाले. पुन्हा 1999 च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेसतर्फे कृष्णा घोडा यांना संधी मिळाली व ते विजयी झाले. या दरम्यान काँग्रेसमध्ये फुट पडली व कृष्णा घोडा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. 2004 मध्ये कृष्णा घोडा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.

त्यानंतर मतदारसंघाची फेररचना झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेला तलासरी तालुका जव्हार मतदारसंघातून वगळून डहाणू विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आणि 2009 च्या निवडणूकीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने गमावला. कृष्णा घोडा यांना पराभूत करुन येथून मार्क्सवादी पक्षातर्फे राजाराम ओझरे विजयी झाले.

2014 च्या सार्वत्रिक निवडणूकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे राजाराम ओझरे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांचे चिरंजीव सुधीर ओझरे यांनी बंडखोरी केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वतंत्र निवडणूक लढविण्यात आली. त्याच वेळी पंतप्रधान मोदी यांची लाट आलेली होती. या सर्वाचा फायदा घेत भाजपच्या पास्कल धनारे यांनी 44 हजार 849 मते मिळवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बारक्या मांगात यांचा 16 हजार 700 मतांनी पराभव केला. मांगात यांना 28 हजार 149 मते मिळाली होती. माकपचे बंडखोर सुधीर ओझरे यांना 12 हजार 968 मते मिळाली होती. या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविणारे शंकर नम यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला अवघी 7 हजार 847 मते मिळून त्यांचे डिपॉझीट जप्त झाले होते.

सध्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे?
डहाणू मतदारसंघात भाजपमध्ये बर्‍यापैकी इनकमिंग झालेले आहे. काँग्रेसचे तत्कालीन तालुका अध्यक्ष भरत राजपूत हे आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले व नगराध्यक्षही बनले. प्रतिकूल परिस्थितीत भाजपला सोडून गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी घरवापसी केलेली आहे. 2018 मध्ये खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजेंद्र गावीत यांना संधी देण्यात आली. डहाणू विधानसभा मतदारसंघातून गावीत यांना सर्वाधिक 49 हजार 181 मते मिळाली. तर माकपचे किरण राजा गहला यांना 42 हजार 517 मते मिळाली होती. शिवसेनेच्या श्रीनिवास वणगा यांना 38 हजार 778 मते मिळाली. येथून काँग्रेसचे दामोदर शिंगाडा यांना अवघी 5 हजार 955 व बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 5 हजार 484 मते मिळाली. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मते भाजप व शिवसेनेकडे विभागली गेल्यामुळे युतीची आकडेवारी वाढली.

मात्र 2019 मध्ये चित्र बदललेले आहे. 2019 च्या 5 महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत डहाणू विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना सर्वाधिक 80 हजार 286 मते मिळाली होती. त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. शिवसेना भाजपा युतीचे राजेंद्र गावीत यांना येथून 72 हजार 139 मते मिळाली. (2018 च्या पोटनिवडणुकीत भाजप व शिवसेनेची एकत्रित मते 87,959 होती) ही मते बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा 8 हजार 147 ने कमी होती. या निवडणूकीपासून विरोधकांच्या पास्कल धनारे यांना पराभूत करण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. धनारे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी थोडेफार इनकमिंग सुरु केले व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांना भाजपमध्ये आणलेले असले तरी नवीन कार्यकर्त्यांचे प्रस्थापित गटाशी कसे जमते यावरही गणित अवलंबून आहे.

2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपपेक्षा विरोधकांना 8 हजार 147 मते अधिक मिळाल्यामुळे विरोधकांकडून हेच सुत्र विधानसभा निवडणूकीत कायम ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. माकपचे विनोद निकोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. नूसता पाठिंबा देऊन हे पक्ष थांबलेले नाहीत, तर माकपाची निवडणूकीची सुत्रे सांभाळताना दिसत आहेत. माकपाचे हाडवैरी असलेल्या कष्टकरी संघटनेने माकपला पाठिंबा दिलेला आहे. त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेची पार्श्वभूमी असलेले रमेश मलावकर यांनी केलेली बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डहाणू विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवारांविषयी संक्षिप्त माहिती:-

पास्कल धनारे

विद्यमान आमदार पास्कल धनारे हे 12 वी पास असून ते या मतदारसंघातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. हॉटेल, शेती आणि रेशनिंग हे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. धनारे यांचे सन 2013-14 या आर्थिक वर्षात 4 लक्ष 28 हजार 595 इतके उत्पन्न होते. ते आमदार झाल्यावर पहिल्या वर्षी, 2014-15 मध्ये देखील त्यांचे वार्षिक उत्पन्न 4 लक्ष 37 हजार 389 इतके होते. मात्र आमदारकीची 5 वर्ष पूर्ण होताहोता दरवर्षी सरासरी उत्पन्न दुपटीने वाढत गेले असून 2018-19 मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 26 लक्ष 73 हजार 332 झाले असून ते 600 टक्क्यांनी वाढले आहे. 5 वर्षापूर्वी त्यांची संपत्ती 49 लक्ष 48 हजार 708 रुपयांची होती. 14 लाख रुपयांचे दायित्व होते. आता त्यांच्या संपत्तीत भर पडली असून ती 2 कोटी 13 लक्ष 45 हजार 728 इतकी झाली असून 400 टक्क्याने वाढली आहे. एकंदरीतच त्यांना अच्छे दिन आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल असून आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही.

भारताचा कम्यूनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे विनोद भिवा निकोले यांचे 12 वी पर्यंत शिक्षण झालेले असून ते पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांना पक्षातर्फे दरमहा 5 हजार रुपये मानधन मिळते. तेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यांच्याकडे पॅन कार्ड देखील नसून कुठलीही मालमत्ता नाही. त्यांच्या पत्नी या दरमहा 6 हजार मानधनावर शिक्षण सेविका म्हणून काम करीत आहेत. सामान्य कार्यकर्त्याला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून त्याच्यामागे पक्षाची शक्ती उभी करण्याची हिंमत माकपने दाखवली आहे.

या मतदारसंघातून 2 उच्च शिक्षित उमेदवार निवडणूक लढवीत असून वंचित बहूजन आघाडीचे शिलानंद बिना काटेला यांचे बी.ए., एल.एल.बी., एल.एल.एम. इतके शिक्षण झालेले आहे. भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रविण नवशा वळवी यांचे देखील बी.एल.एस.एल.एल.बी. शिक्षण झालेले आहे.

भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश मलावकर यांचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले असून ते दि डहाणूरोड जनता सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी आहेत. बँकेचे तत्कालीन चेअरमन, तथा डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्यावरील 2010 मध्ये 6 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात मलावकर यांना देखील आरोपी बनविण्यात आलेले आहे. त्या काळात ते संचालक मंडळावर कर्मचारी प्रतिनिधी होते. त्यांनी अनेक वर्षे विश्व हिंदू परिषदेच्या वडकून येथील वसतीगृहाचे संचालन केलेले आहे.

पास्कल धनारेंसाठी कळीचे मुद्दे :

धनारे यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याने निवडणूकीत वाटप करण्यासाठी दारुच्या बाटल्यांची खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. धनारे यांनी देखील अधिकार्‍याच्या विरोधात हक्कभंगाची तक्रार केली होती. या परस्परविरोधी तक्रारींच्या चौकशीतून नेमके काय तथ्य बाहेर आले, याबाबत धनारे किंवा सरकार यांनी आजपर्यंत कुठलाही खुलासा केलेला नाही. धनारे यांनी दाखवलेल्या मौनातून हे प्रकरण तडजोडीने मिटवल्याचे संकेत मिळत आहेत.

रेशनिंग दुकाने आधारशी जोडल्यानंतर रेशनिंगच्या व्यवसायाला मर्यादा आल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देताना राज्यातील शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. मात्र रेशनिंग, शेती आणि हॉटेल हा व्यवसाय करणार्‍या धनारे यांची श्रीमंती अनेक पटीने वाढली आहे. त्यांच्या या प्रगतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

डहाणू विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा बोजवारा वाजलेला आहे. येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नसल्याने येथील गोरगरीब रुग्णांना नजीकच्या गुजरात राज्यातील वैद्यकीय सोईंवर अवलंबून रहावे लागत आहे. धनारे यांचा आरोग्य विभागावर जराही अंकुश नाही. डहाणू तालुक्यात वेदांता हे खासगी वैद्यकीय महाविद्यालय असून कागदोपत्री त्याच्याशी संलग्न 300 खाटांचे रुग्णालय आहे. हे रुग्णालय खरोखरच चालवले तर परिसरातील गोरगरिबांच्या आरोग्याचा प्रश्न सुटायला मदत होऊ शकली असती. मात्र त्याकडे धनारे यांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. शासकीय रुग्णालयांकडून खासगी डॉक्टरांचे हित सांभाळले जाते. त्याचे ताजे उदाहरण देता येईल. दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी डहाणू उप जिल्हा रुग्णालयात एक आदिवासी महिला दाखल झाली होती. तीच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. या रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ नेमलेले आहेत. योगायोगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे त्या दिवशी डहाणू उप जिल्हा रुग्णालयात उपस्थित होत्या. वानेरे स्वतः स्त्री रोग तज्ञ आहेत. त्या स्वतः उपलब्ध असताना आदिवासी महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी एका खासगी स्त्री रोग तज्ञाला बोलावण्यात आले व शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. वानेरे यांनी का केली नाही? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात धनारे यांना अपयश आलेले आहे.

भाजपमधली अंतर्गत गटबाजी ही धनारेंसाठीची डोकेदुखी ठरत आहे. भाजपमध्ये ओरीजनल भाजपवाले, तुलनेने आधी पक्षांतर करुन भाजपमध्ये स्थिरावलेले व उशिराने पक्षात आलेले असे विविध गट आहेत. सध्या डहाणू तालुक्यात 3 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या भरत राजपूत गटाचा वरचष्मा आहे. त्यांच्या आधी दाखल झालेल्या डॉ. अमित नहार यांना भाजप सोडावे लागलेले आहे. त्यांच्यानंतर भाजपमध्ये दाखल झालेले मिहीर शहा हे कसे आणि किती काळ भाजपमध्ये टिकतील हे येणारा काळ ठरवणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे डहाणूत पत्रकार परिषद घेण्यासाठी आले असताना तेथे फक्त भरत राजपूत आणि त्यांचे मर्जीतील कार्यकर्ते उपस्थित होते. अन्य भाजप कार्यकर्त्यांना तावडे यांच्या दौर्‍याविषयी माहिती देखील नव्हती. त्यातून थोडेफार नाराजीचे नाट्य देखील झाले. या परिस्थितीवर भरत राजपूत यांना न दुखवता धनारे कसा मार्ग काढतील हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

हि बातमी पीडीएफ स्वरूपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा!

Print Friendly, PDF & Email

comments