दिनांक 18 January 2020 वेळ 11:10 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मनोर : 500 रुपयांसाठी केला मित्राचा खून

मनोर : 500 रुपयांसाठी केला मित्राचा खून

  • 24 तासात खुनी मित्रांना अटक
  • मनोर पोलिसांची कामगिरी

राजतंत्र न्युज नेटवर्क/मनोर, दि. 11 : मनोर, दि. 11 : मनोरमधील कोंढाण-धोडडेपाडा येथील एका मोकळ्या जागेत सडलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मनोज अनंता भुतकडे या 19 वर्षीय तरुणाच्या मृदेहाची ओळख पटवून 24 तासात त्याच्या खुन्यांना गजाआड करण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे. मनोजने उसने घेतलेले 500 रुपये परत करण्यावरुन उद्भवलेल्या वादातून त्याच्या 2 मित्रांनीच जबर मारहाण करुन व गळा आवळून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

कोंढाण-धोडडेपाडा येथील साबळा परिवाराच्या भातशेतीला लागूनच असलेल्या मोकळ्या माळरान जागेत 8 ऑक्टोबर रोजी एका तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. कोंढाण-धोडडेपाडाचे पोलीस पाटील बांधण यांनी याबाबत मनोर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जागीच मृतदेहाची ओळख पटवली असता मनोज अनंता भुतकडे असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समोर आले. यानंतर अकस्मित मृत्यूची नोंद करुन पोलिसांनी आपला तपास सुरु केला. पोलिसांच्या चौकशीत मनोज भुतकडे हा 5 ऑक्टोबर रोजी कोंढाण येथे त्याच्या आजीकडे आला होता. तर त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी तो आपल्या मित्रांसोबत दारु पिऊन गावात फिरत असताना त्याला काहींनी पाहिले होते. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला होता.

या माहितीनंतर मनोर पोलिसांनी लागलीच वेगवेगळी तपास पथके तयार करुन कोंढाण गाव व घटनास्थळ परिसरात आपाल तपास सुरु केला. यावेळी मनोज ज्या मित्रांसोबत दारु पिण्यासाठी बसलेला अशा सर्वच मित्रांची माहिती काढुन प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पध्दतीने विचारपुस करण्यात आली. अखरे मनोजच्या खूनाची प्रत्यक्ष घटना पाहणारा एक तरुण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली.

सदर तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, मनोजने काही महिन्यांपुर्वी कोंढाण येथील त्याच्या दोन मित्रांकडून 500 रुपये उसने घेतले होते. तो कोंढाण येथे आल्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी त्याच मित्रांसोबत दारु प्यायला. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली असता आपल्याकडे आता पैसे नसल्याचे मनोजने त्यांना सांगितले. यावरुन त्यांच्यात वाद उद्भवला व दोघांनीही दारुच्या नशेत असलेल्या मनोजला जबर मारहाण केली. यावरच न थांबता दोघांनी त्याचे गुप्तांग जोरात आवळून व त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. तर मनोजचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यात देखील मारहाण व गळा दाबल्याने मनोजचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302,504,506,34 नुसार गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top