दिनांक 18 January 2020 वेळ 11:55 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाड्यातील 195 महिला बचत गटांना अनुदानाअभावी घरघर

मोखाड्यातील 195 महिला बचत गटांना अनुदानाअभावी घरघर

  • 9 महिन्यांपासुन अनुदानाची प्रतिक्षा
  • नवरात्र-दिवाळीही कडकीत

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 6 : तालुक्यातील 229 अंगणवाडी केंद्रांमधुन पोषण आहार पुरविणार्‍या 195 बचत गटांना मागील 9 महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे अंगणवाडीतील कुपोषित बालकांना पोषण आहार पुरविताना अगोदरच दुर्बल असणार्‍या बचत गटांना अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा आर्थिकदृष्ट्या कुपोषित असलेल्या एकूणच बचतगटांची प्रलंबित देयके अदा करण्याबाबत महिला व बालकल्याण आयुक्तालयाकडून व स्थानिक बालविकास विभागाकडून कमालीची कुचराई केली जात आहे.

मोखाड्यातील 195 बचत गटांची जानेवारी ते सप्टेंबर अशी 9 महिन्यांची लाखो रूपयांची देयके महिला बालकल्याण कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. मोखाडा तालुक्यातील बचत गटांची आर्थिक परिस्थिती यथातथाच आहे. त्यातही मानधन थकल्यास या बचत गटांना अंगणवाडीतील बालकांचा व्यवस्थित पोटप्रपंच चालविण्यासाठी वेळप्रसंगी आपले स्रीधन गहाण ठेवून पोषण आहार पुरवावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. वारंवार घडणारे बालमृत्यू टळावेत, मुलांना सकस आणि वेळेवर पोषण आहार मिळावा व त्यायोगे महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्याचे शासनाचे धोरण आहे. तथापी बचतगटांचे कृत्रिमतः आर्थिक शोषण होत असल्याने महिला बचत गट मोडकळीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बचत गटांची आर्थिक आबाळ होत आहे. पर्यायाने बालकांचीही हेळसांड होत असेल याची जवळुन जाणीव असतानाही दरवर्षी तालुक्यातील बचत गटांची अनुदानाअभावी परवड होत असते. वास्तविकत: मोखाडा तालुका हा कुपोषणाबाबत अत्यंत संवेदनशील आहे. असे असतानाही बालकांच्या पोषण आहाराची तजवीज करणार्‍या बचत गटांची गळचेपी होत आहे. त्यामुळे प्रशासन बालकांच्या योगक्षेमाबद्दल किती गंभीर असेल याची कल्पना न केलेली बरी, अशी लोकभावना या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे.

याबाबत मोखाडा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधला असता महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडे 32 लाख रूपयांची मागणी नोंदविलेली आहे. तशी बिले देखील जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेली आहेत. आयुक्त कार्यालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर बचतगटांना लगोलग देयके अदा करण्याची तजविज केली असल्याचे स्पष्टीकरण कार्यालयाने दिले आहे. तसेच दिवाळीपूर्वी बिले अदा करण्याची तरतूद केली जात असल्याची स्पष्टोक्ती मिळाली आहे.

प्रकल्प अधिकार्‍यांची संगीत खुर्ची
नवसंजीवनी योजनेतील महत्वाचा दुवा असलेल्या मोखाडा बालविकास विभागाकडे प्रकल्प अधिकारी नाहीत. पर्यायाने या ठिकाणी तब्बल वर्षातुन दोनदा सहाय्यक गटविकास अधिकार्‍यांकडे पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे बचत गटांना फेब्रुवारी महिन्यापासुन देयके मिळालेली नाहीत. प्रशासन या ठिकाणी कायम स्वरुपी अधिकारी देण्याऐवजी संगीत खुर्चीचा खेळ खेळत आहे. मात्र ही संगीत खुर्ची बचत गटांच्या अनुदानातील पाठशिवणीचा खेळ ठरत असल्याने बचत गटांवर हतबल होण्याची वेळ आली आहे.

शासनाच्या वेळकाढू धोरणावर बचत गटांची नाराजी
याबाबत तालुक्यातील बचत गटांशी संपर्क साधला असता, शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत बचत गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र याबाबत नावानिशी तक्रार करण्यास अनामिक भीतीपोटी कोणताही बचतगट धजावत नसल्याने मुकी बिचारी कुणीही हाका अशी परिस्थिती या बचत गटांची झालेली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top