नागरीक व कामगारांना बाधा

वार्ताहर/बोईसर, दि. 25 : नुकतीच देशातील नंबर 1 ची विषारी एमआयडीसी घोषित झालेल्या तारापूर एमआयडीसीमध्ये राजरोसपणे पर्यावरणात विषारी वायू सोडला जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असुन येथील दोन कारखानदारांनी काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास विषारी वायू सोडल्याने येथील कामगार तसेच परिसरातील नागरीकांना त्याची बाधा झाल्याची घटना घडली आहे.

विविध ग्लोबल व निपुर केमिकल अशी सदर कारखान्यांची नावे आहेत. या कारखान्यांमधुन काल रात्री मोठ्या प्रमाणावर विषारी वायू वातावरणात सोडण्यात आल्याची तक्रार आहे. यामुळे सालवड ते चित्रालय या मुख्य रस्त्यावरुन ये-जा करणार्या नागरिक व कामगारांना तसेच एमआयडीसी परिसरालगत असलेल्या गावातील नागरीकांना डोळ्यांना जळजळ व श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण परिसर या वायू प्रदूषणाने धुकट बनल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे देखील कठीण झाल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. एकुणच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रात्रीची गस्त अपुरी पडते की काय? असा सवाल उपस्थित होत असुन संबंधित कारखान्यांवर कारवाईची मागणी होत आहे.