दिनांक 25 May 2020 वेळ 12:16 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी

अणु उर्जा केंद्राच्या कारभारावर खासदार गावित यांची नाराजी

बोईसरमधील मुख्य रस्त्याबाबत एका आठवड्यात निर्णय घेण्याच्या सुचना

वार्ताहर/बोईसर, दि. 20 : तारापूर अणुऊर्जा केंद्र ते बोईसर रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव सन 2011 पासून प्रलंबित असून त्यामुळे येथील नागरिक मागील 8 वर्षांपासुन नवीन व भक्कम रस्त्याची वाट पाहत असल्याचे सांगत खासदार राजेंद्र गावीत यांनी अणु उर्जा केंद्राच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मार्गाचे रुंदीकरण करण्याबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याच्या सुचना केल्या आहेत.

या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत काल, गुरुवारी खासदार गावित यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी तारापूर अणुऊर्जा केंद्रापासून या केंद्राच्या कर्मचार्‍यांच्या रहिवासी वसाहती (टॅप्स कॉलनी) पर्यंत असलेल्या रस्त्याचा वापर टॅप्स अधिकारी – कर्मचारी नियमितपणे करत आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावरून अणु इंधनासह इतर सर्व महत्त्वपूर्ण उपकरणांची वाहतूक केली जाते. त्यामुळे हा मार्ग आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्याचे प्रस्तावित असून या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव सन 2011 पासून प्रलंबित असल्याचे बोईसरच्या सिटीझन फोरमच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले आहे.

यावर स्पष्टीकरण देताना टॅप्सचे प्रकल्प संचालक ए. के. राजपूत यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे प्रथम सांगितले. मात्र यासंदर्भात पुरावे सादर केल्यानंतर चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला सुरुवातीला मान्यता देण्यात आली होती, मात्र सार्वजनिक वापरातील रस्त्यांवर सामाजिक बांधिलकी निधीतून खर्च न करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्याने या प्रस्तावाला आर्थिक मान्यता मिळाली नसल्याचे टॅप्सचे अधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच सुमारे 22 कोटी रुपयांच्या चौपदरीकरणाच्या खर्चापैकी 20 टक्के रक्कम आगाऊ पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आल्याने हा प्रस्ताव नंतर बारगळल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. त्यावर गावित यांनी तारापूर अणुशक्ती केंद्र ते बोईसर रेल्वे स्थानकापर्यंतचा हा रस्ता मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने रुंदीकरणाबाबत एका आठवड्यात सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय घ्यावा, अशी सुचना केली.

यावेळी तारापूर अणुऊर्जा केंद्राशी संबंधित तसेच तारापूरमधील औद्योगिकरणामुळे निर्माण झालेल्या सुरक्षा, प्रदूषण तसेच वाहतूक कोंडीच्या संदर्भातही संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या अधिकार्‍यांसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top