दिनांक 04 July 2020 वेळ 12:42 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाडा पंचायत समितीने वाटली पुरस्कारांची खिरापत

मोखाडा पंचायत समितीने वाटली पुरस्कारांची खिरापत

सहा ऐवजी 15 शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : सालाबादप्रमाणे चालुवर्षीही मोखाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून खोडाळा येथील मोहिते कॉलेजमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. परंतू केवळ सहाच शिक्षकांना हा पुरस्कार देणे क्रमप्राप्त असतानाही समितीने 15 शिक्षकांना पुरस्कार देण्याचा नविनच पायंडा पाडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर पंचायत समितीने पुरस्कारांची खिरापत वाटली असल्याचा आरोप जनतेमधुन केला जात आहे.

वास्तविकतः मोखाड्यातील 13 केंद्रांमधील 6 बिटमधून 6 आदर्श शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरीत केले जातात. मात्र चालू वर्षी नियमीत 6 पुरस्कारांव्यतिरिक्त 1 आश्रमशाळा, 1 हायस्कुल आणि 7 अन्य उपक्रमशील पुरस्कारांची निर्मिती पंचायत समिती प्रशासनाने केल्याने हे उपक्रमशील पुरस्कार देण्यामागे प्रशासनाचा कोणता हेतू आहे यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दुसरीकडे, यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी खोडाळा गावचे सरपंच, पोलीस पाटील व उपसरपंचांना कोणतेही निमंत्रण न दिल्याने नाराजीचा सुर दिसून येत आहे. तर मोखाडा पंचायत समितीने हेतूपुरस्कर डावलले असल्याची प्रतिक्रिया संबंधितांकडून ऐकायला मिळाली आहे.

याबाबत खोडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुरस्कार निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून एकूणच कार्यक्रमावर नाराजी दर्शविली आहे. नैतिकदृष्ट्या खोडाळा ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन कार्यक्रमाचे आयोजन व्हायला हवे होते. परंतु पंचायत समितीने हम करे सो कायदा या तत्वाने कार्यक्रम राबवून घेतला असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.

शिवसेनेच्या गोटात धुसपूस

मोखाडा पंचायत समितीवर शिवसेना व खोडाळा ग्रामपंचायत शिवसेनेकडे असतानाही खुद्द सेनेच्याच सरपंचाला डावलून कार्यक्रमाचे नियोजन झाल्याने शिवसेनेच्या गोटात मोठ्या प्रमाणावर धुसपूस दिसून आली. याबाबत शिवसेनेच्या नेत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असून पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

एकूणच पंचायत समिती प्रशासनाने चाकोरी बाहेर जाऊन पुरस्कार वाटल्याने हा पुरस्कार सोहळा चांगलाच वादाच्या भोवर्‍यात सापडला असुन ही खिरापत पंचायत समिती प्रशानाच्या अंगलट येण्याचे चित्र आहे.

गंगाराम मांवजी भुसारे, स्वाती जयराम पानसरे, रविंद्र साहेबराव पाटील, रामेश्वर अरूणराव जाधव, लालासाहेब शिवाजी धायगुडे, सुरेंद्र रघुनाथ राऊत या 6 शिक्षकांव्यतिरिक्त उपक्रमशील शिक्षक म्हणून अनिल अर्जून जाधव, ललीत आनंदराव मोरे, रामदास पुंजाजी वाजे, गौतम धर्माजी ओमासे, उज्वला शांतीलाल पाटील, प्रमोद सुधाकर खंबायत व नारायण दामू डावकरे या 7 शिक्षकांना पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत. तसेच आश्रमशाळेचे देवीदास रामश्चंद्र विशे आणि माध्यमिकचे चुडामन रामश्चंद्र पाटील यांनाही पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top