खोडाळ्यातील प्राथमिक आरोग्य सेवा रामभरोसे

0
1
  • वैद्यकीय अधिकारी नाही
  • कर्मचार्‍यांचाही तुटवडा

दीपक गायकवाड/मोखाडा, दि 10 : तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकार्‍यांअभावी रामभरोसे झाली आहे. त्यामुळे येथे तातडीने कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्याची मागणी खोडाळा ग्रामपंचायतीने केली आहे. अन्यथा आरोग्य विभागाच्या निष्क्रियते विरूध्द व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील 27 गाव-खेडे संलग्न आहेत. त्याशिवाय लागूनच असलेल्या नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर रूग्णांचा ओघ येथे उपचारासाठी येत असतो. परंतू या केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. येथील एकमेव वैद्यकीय अधिकार्‍याची बदली झाल्याने मागील दोन महिन्यांपासून येथे ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी अतिरिक्त सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणची आरोग्य सेवाही विस्कळीत होत आहे.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येथे 1 एमबीबीबएस व बीएएमएस वैद्यकिय अधिकार्‍याची नेमणूक आहे. मात्र मागील 2 ते 3 वर्षांपासून येथील एमबीबीबएस वैद्यकिय अधिकार्‍याचे पद रिक्त आहे. तर बीएएमएस वैद्यकिय अधिकार्‍याच्या पदाचीही परवड सुरू आहे. येथे दररोज 200 ते 250 रूग्णांची ओपीडी असून आयपीडी रूग्णांचे प्रमाणही लक्षणिय आहे. त्यामानाने आरोग्य विभाग येथील रुग्ण सेवेबाबत तितकासा गंभीर नसल्याचेच दिसते.

दरम्यान, या आरोग्य केंद्रात कारेगाव, वाकडपाडा, सुर्यमाळ, तळ्याचीवाडी, सायदा आणि गोमघर येथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी आलटून पालटून सेवा बजावली आहे. तर सध्या कारेगाव उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी अभिजीत गोखले यांच्याकडे तात्पूरता पदभार सोपविण्यात आला आहे. गोखले यांना या ठिकाणी सोमवार आणि गुरूवार असे दोन दिवस काम पाहण्यास सांगण्यात आले आहे. वास्तविकतः येथे कायम डॉक्टरांची गरज असतानाही आरोग्य विभाग त्याबाबत गंभीर नसल्याने येत्या आठवडाभरात योग्य तो तोडगा न काढल्यास आरोग्य विभागाच्या विरोधात व्यापक जन आंदोलन उभारण्यांत येईल, असे खोडाळ्याचे सरपंच प्रभाकर पाटील व उप सरपंच मनोज कदम यांनी स्पष्ट केले आहे.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर शासन दरवर्षी लाखो रूपये खर्च करीत आहे. परंतू आवश्यक त्या उपाययोजनांबाबत कमालीची कुचराई करीत आहे, असे नागरीकांमध्ये बोलले जात आहे. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर रूग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन येथे ग्रामीण रूग्णालय द्यावे, अशी शिवसेनेची बर्‍याच वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी सेनेचे कार्यकर्ते माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या सोबत पालघर जिल्हाधिकार्‍यांना भेटले आहेत. या मागणीबाबत अद्याप विचार झाला नसला तरी किमान आरोग्य सुविधा तरी व्यवस्थित देणे क्रमप्राप्त असतानाही आरोग्य विभाग येथील रुग्णांची हेळसांड करीत असल्याचेच चित्र आहे.

Print Friendly, PDF & Email

comments