डहाणू जेष्ठ नागरिक संघाचे 6 वे वार्षिक अधिवेशन संपन्न

0
3

प्रतिनिधी/डहाणू, दि. 10 : जेष्ठ नागरिक संघाचे सहावे वार्षिक अधिवेशन 9 सप्टेंबर रोजी संघाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिलेदार गणपती मंडळाच्या मंडपात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधीज्ञ भरत माच्छी, संघाचे उपाध्यक्ष मारुती वाघमारे, सचिव बापुराव देवकर, सहसचिव वसंत तांडेल, कोषाध्यक्ष मुरलीधर माच्छी, सहकोषाध्यक्ष विवेक नवघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मारुती वाघमारे यांनी प्रास्ताविक करताना संघाने मागील वर्षभरात केलेल्या कामाची, राबविलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना करुन दिली तसेच भविष्यातील विविध योजनांची माहिती दिली. बापूराव देवकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त व मुरलीधर माच्छी यांनी मागील वर्षीचा जमाखर्च वाचला व त्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान शिलेदार गणेश मंडळांच्या गणपतीच्या दुपारच्या आरतीत सर्वांनी सहभाग घेऊन भव्य दिव्य गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात झाली. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विधीज्ञ भरत माच्छी यांनी ज्येष्ठांच्या व महिलांच्या संबंधित विविध कायद्यांची व कालपरत्वे त्यामध्ये झालेल्या सुधारणांची सविस्तर माहिती देतानाच कर्तव्याचीही जाणीव करुन दिली. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. यावेळी त्यांनी कायदेविषयक विना मोबदला सल्ला देण्याची ग्वाही देतानाच दिर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. धो-धो पडणार्‍या पावसाची तमा न बाळगता 70 ते 75 सभासदांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

दरम्यान सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असणारे, वयाची पंच्याहत्तरी गाठलेले व ज्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाली अशा सभासद दांपत्याचा गुलाब पुष्प, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वसंत तांडेल यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या सभासद व के.एल.पोंदा हायस्कूलच्या माजी शिक्षीका सौ. वृषाली टंगसाळी यांनी खुमासदार शैलीत करून कार्यक्रमात रंगत आणली. शेवटी स्नेह भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.

Print Friendly, PDF & Email

comments