दिनांक 21 February 2020 वेळ 10:40 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 चा जिल्हास्तरीय शुभारंभ!

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 चा जिल्हास्तरीय शुभारंभ!

पालघर, दि. 21 : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे आज हागणदारीमुक्त ग्रामपंचायत द्वितीय स्तर पडताळणी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 चा शुभारंभ करण्यात आला.

पालघर पूर्वेतील चिंतामणी मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व समाजकल्याण सभापती दर्शना दुमाडा, महिला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्त्ना खिल्लारे, महिला बालविकास अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी, कृषी विकास अधिकारी के. बी. कारखिले, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी आदी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 चा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.

शासनाने जिल्हा हागणदारमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असून ग्रामीण भागातील जनतेने शौचालयाचा वापर करणे गरजेचे आहे. पाणी टंचाई असेल त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा, परंतु शौचालयाचा वापर केलाच पाहिजे, असे मत व्यक्त करून खरपडे यांनी जिल्ह्यात अधिकारी व कर्मचार्‍यांचा तुटवडा असूनही जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जे कार्य झाले आहे; त्याबद्दल अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. तसेच यापुढे गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचर्‍याचे व्यवस्थापन व प्लास्टिक बंदीची काटोकोर अंमलबजावणी करावयाची आहे, असे खरपडे म्हणाले.

केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे हागणदारीमुक्त ग्रामपंचायत दुसर्‍या टप्प्यातील पडताळणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा स्तरावरून प्रत्येक गावाकरिता समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. समिती गठीत करण्याचे पूर्ण अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना असतात. या प्रक्रियेसाठी प्राथमिक पडताळणी समिती व फेर पडताळणी समिती अशा दोन प्रकारच्या समित्या गठीत करण्यात येतात. प्राथमिक पडताळणी तपासणी समितीमध्ये केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संबंधित ग्रामपंचायतींमधील एक अंगणवाडी सेविका, एक मुख्याध्यापक अथवा त्यांचे प्रतिनिधी, एक स्वच्छग्रही, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, आशा सेविका, महिला बचत गटाची एक सदस्या, जलसुरक्षक आदींपैकी सहा सदस्य असतील, अशी माहिती तुषार माळी यांनी याप्रसंगी दिली.

दरम्यान, बेलापूर येथील पाणी व स्वच्छता विभागाचे विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे यांनी कार्यशाळेस उपस्थित जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षेतील तज्ञ तसेच तालुका स्तरावरील सांख्यिकी, ग्रामपंचायत, आयसीडीएस, एमएसआरएलएम, आरोग्य, कृषी आदि विभागातील विस्तार अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले.

comments

About Rajtantra

Scroll To Top