26 वर्षीय तरुणाचा खून, आरोपीला 24 तासात अटक

0
11

वालीव पोलिसांची कामगिरी

राजतंत्र न्युज नेटवर्क/ वसई, दि. 6 : दोन महिन्यांपुर्वी लहान भावाला झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून 26 वर्षीय तरुणाचा गळा चिरुन त्याचा निर्घूण खून करणार्‍या आरोपीला वालीव पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. उस्मान इसहार खान असे आरोपीचे नाव असुन त्याने काल, 5 ऑगस्टच्या मध्यरात्री जावेद सरवर खान या तरुणाचा जुन्या वादातून खून केला.

नालासोपारा पुर्वेतील वाकनपाडा येथील रहिवासी असलेल्या जावेद खान या तरुणाचा 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारास गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी जावेदचा भाऊ परवेझ खान याच्या फिर्यादीवरुन वालिव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात खुन्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तीन पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. गुन्ह्यानंतर आरोपीने मागे कोणताही पुरावा न सोडल्याने पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान जावेदची पार्श्‍वभुमी तपासली असता त्याचे उस्मान खान या तरुणासोबत जुने वाद असल्याची माहिती पुढे आली. हाच धागा पकडून पोलिसांनी आपला तपास केला असता उस्मान खान फरार असल्याचे समोर आले व पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिक बळावला. अखेर पोलिसांनी तपासाची चर्के फिरवली व 24 तासाच्या आत उस्मान खानला मुंबईतील मुलूंड येथून ताब्यात घेण्यात आले.

उस्मानला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली व दोन महिन्यांपुर्वी जावेदने त्याच्या साथिदारासह आपल्या लहान भावाला मारहाण केल्याने बदला म्हणून आपण त्याचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याविरोधात वालिव पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक अनंत पराड याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments