डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

0
541

पालघर, दि. 18 : पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. कैलास शिंदे यांनी आज, गुरुवारी मावळते जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. डॉ. नारनवरे यांची सिडको येथे बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी डॉ. शिंदे यांचे स्वागत केले. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांचा आढावा घेतला.

डॉ. शिंदे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असून मंत्रालयात मुख्यमंत्री सचिवालय आणि राज्यपाल यांच्या सचिवालय येथे उपसचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे. 2017 साली त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली. पालघर येथे येण्यापूर्वी ते सातारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते.

स्वच्छ भारत मिशन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, टंचाई निवारण आदी क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कार्याची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments