दिनांक 24 February 2020 वेळ 7:37 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर महाविद्यालयात रंगणार स्टॅन्ड अप कॉमेडी स्पर्धा!

दांडेकर महाविद्यालयात रंगणार स्टॅन्ड अप कॉमेडी स्पर्धा!

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजन

पालघर, दि. 15 : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. पालघर केंद्रासाठीची स्पर्धा पालघरमधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात गुरुवार, 18 जुलै रोजी होणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रांवर पात्र ठरणार्‍या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील विनोदी कलावंतांचे टॅलेंट हंट करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने राज्य शासन करणार आहे. लवकरच या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय फेर्‍यांना सुरुवात होणार असून, प्रत्येक केंद्रावरील विजेत्याला 20 हजार रुपये आणि उपविजेत्याला 15 हजार रुपये अशी रोख स्वरुपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर सकाळी 10 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत स्पर्धेचे आयोजन होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी 7506848055 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर 2 मिनिटांचे सादरीकरण चित्रित करून 17 जुलैपर्यंत पाठवायचे आहे. यातून निवड करण्यात आलेल्या स्पर्धकाला सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या केंद्रावर 7 ते 8 मिनिटे सादरीकरण करावयाचे आहे.

विनोद हा ’पुलं’च्या साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समाजातील माणसांच्या वृत्तींवर आपल्या खुमासदार शैलीत ’पुलं’नी कायम भाष्य केले. स्टँड अप कॉमेडी ही स्पर्धा देखिल अशाच स्वरुपाची होणार आहे. एखाद्या वृत्तीवर, माणसाच्या स्वभावावर दैनंदिन व्यवहारी जीवनात घडणार्‍या प्रसंगांवर मिश्कील टिप्पणी करत त्यातील विनोद सर्वांसमोर आणण्याचा प्रकार अनेक स्टँड अप कॉमेडियन करतात. सध्या तरुणाईत हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे. याच धर्तीवर पुलंचे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित केली आहे. या स्पर्धेदरम्यान सर्व जिल्हा केंद्रांवर पु.ल. जत्रोत्सवही आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पुलंचे साहित्य, त्यांची भाषणे, त्यांचे कार्यक्रम अनुभवण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.

या संपूर्ण उपक्रमाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवरून केले जाणार असून, कलावंतांची कला महाराष्ट्रभर पोहोचावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील शहरी; तसेच ग्रामीण भागातील विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ देण्याच्या हेतूने ही स्पर्धा राबवण्यात येत आहे. या स्पर्धेस भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे आणि पालघर केंद्राचे समन्वयक डॉ. मनीष देशमुख यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top