दिनांक 12 December 2019 वेळ 9:45 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » नूतन बाल शिक्षण संघातर्फे आयोजित प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत परिसंवाद संपन्न

नूतन बाल शिक्षण संघातर्फे आयोजित प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत परिसंवाद संपन्न

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 14 : वैचारिक देवाणघेवाण करणे, परस्परांच्या अनुभवाचा फायदा करुन घेणे, यासाठी शैक्षणिक संस्था व शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे एक व्यासपीठ असावे ही संकल्पना साकारण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून कोसबाड येथे नुतन बाल शिक्षण संघातर्फे ’प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2019 – अपेक्षा आणि आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादात सोनपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, करिअर काऊन्सिलर अजय भगत, वकील मॉडेल स्कूलचे अध्यक्ष राजेश पारेख, दीपक पाटील, शिक्षणतज्ञ श्वेता नवलकर, अध्यापिका मेधा मराठे, प्राध्यापिका चिन्मयी चुरी यांनी सहभाग घेतला. नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी परिसंवादाचे संचलन केले.

प्रारंभी प्रास्ताविक करताना दै. राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी पद्मभूषण ताराबाई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात डहाणू तालुक्यातील आदिवासी व मागास भागात केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करुन त्यांना जे 70 ते 80 वर्षांपूर्वी पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत जे उमगले तेच आता प्रस्तावित नविन शैक्षणिक धोरणात स्वीकारले आहे. ताराबाईंनी या प्रस्तावित धोरणाची मुहूर्त मेढ स्वातंत्र्यपूर्व काळात नुतन बाल शिक्षण संघातर्फे रोवली म्हणूनच असा कार्यक्रम आयोजित करण्यात नुतन बाल शिक्षण संघाने पुढाकार घेतला. जगात शिक्षणाचा हक्क देणारा भारत 135 वा देश आहे. आपल्या आधी 134 देश आहेत त्यामुळे आपण किती उशीर करतो आहोत याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे या प्रस्तावित धोरणावर फक्त टिका करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून चांगल्या सूचना सादर करुन सदरचे प्रस्तावित धोरण परिणामकारक व्हावे यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी भूमिका मांडली.

परिसंवादाचे आयोजन हे निमित्त व पहिला प्रयत्न असून विविध शैक्षणिक संस्था व शिक्षणतज्ञ यांनी विविध गटांची निर्मिती करुन शैक्षणिक संवादाचे कार्य पुढे नेले पाहिजे, अशी अपेक्षा चंद्रगुप्त पावसकर यांनी व्यक्त केली. प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आवाका लक्षात घेता त्यातील सर्व मुद्द्यांना स्पर्श करणे अवघड असल्याने काही महत्वाच्या मुद्यांवर परिसंवादात चर्चा घडवून आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक आकृतीबंधाची प्रस्तावित पुनर्रचना आणि त्याची व्यावहारिकता, 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठीच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या आकृतीबंधाची आवश्यकता व आव्हाने, शिक्षणाच्या हक्काची व्याप्ती वाढवून 3 वर्षीय बालक ते 18 वर्षे वयोगटातील युवकांना शिक्षणाचा हक्क देण्याचा प्रस्ताव व त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, शिक्षकांच्या शैक्षणिक कामगिरीचे मुल्यमापन करण्याचा प्रस्ताव आणि त्याची उपयोगिता, शैक्षणिक विषयांची निवड करण्यासाठी उपलब्ध होणारे बहु पर्याय, नवे शैक्षणिक धोरण कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सहाय्यकारी ठरेल का, हे महत्वाचे मुद्दे चर्चेसाठी घेण्यात आले.

यावेळी मुकूंद भागवत, सुधीर दांडेकर, सुरेश चव्हाण, बारी सर, विद्याधर अमृते, अच्युत पाटील यांनी आपले विचार मांडले. अशा परिसंवादांची पालघर जिल्ह्यात आवश्यकता असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

समारोपाचे भाषण करताना नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष प्रकाश करंदीकर यांनी शैक्षणिक धोरणातील अनेक तरतूदींचा उहापोह करुन उदाहरणासह उणीवांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग यांना चंद्रावर जाऊन 50 वर्षे झाली आणि आपले पहीले चंद्र यान आता पाठविले जात आहे! यावरुन आपण किती मागे आहोत हे लक्षात येईल. शैक्षणिक प्रगतीवर सामाजिक मानसिकतेचा कसा प्रभाव पडतो हे सांगताना त्यांनी बरेच व्यवसाय आपण तुच्छ मानतो. त्यामुळे आपण आपल्या मुलांना गवंडी, सुतार होऊ देत नाही. नव्या पिढीला दिशा दाखवायला आपण सज्ज झाले पाहिजे. पालकांना शिक्षीत करण्यावर, त्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. शिक्षकांच्या मुल्यमापनास त्यांनी असहमती दर्शवली. वर्गाच्या बाहेर उभे राहिले तरी त्या शिक्षकाचे मुल्यमापन होऊ शकते असे ते म्हणाले.

सुधीर कामत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन उपस्थितांचा उत्साह शेवटपर्यंत कायम ठेवला. संस्थेचे सचिव दिनेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

परिसंवादातील महत्वाचे काही मुद्दे:

असेच शैक्षणिक धोरण बर्‍याच देशांमध्ये अंमलात आणले आहे. पहिल्या 11 वर्षापर्यंत मुलाला काही समजत नाही. त्यामुळे शेवटच्या वर्षाचे शिक्षण लवचिक ठेवण्यात आले पाहिजे. जिथे मुलांना आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते हा महत्त्वाचा भाग आहे. पहिल्या 5 वर्षात मातृभाषेतून शिक्षण देण्याची तरतूद या धोरणात आहे. जेवढी मातृभाषेतून विद्यार्थ्यांची विचार क्षमता विकसित होते तेवढी इतर भाषांमधून होत नाही. मुलांना बोंन्झाय करायचे की वटवृक्ष? हे सगळ्यांनी ठरवले पाहिजे.
डॉ. किरण सावे

मुलांची क्रियाशीलता वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत दिसून येते. म्हणूनच आपण म्हणतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या वयातच मुले मोठेपणी त्यांना काय करायचे आहे ते दाखवून देत असतात, पण आपण पालक ते ओळखू शकत नाही. लहान वयात मुलांना शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त करणे हे पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होत असतो.
अजय भगत

पालकांचा सहभाग शेवटपर्यंत असला तर जास्त चांगले होईल. ग्रामीण भागातील पालक अशिक्षित असतात. पालकांना शिक्षीत करण्यासाठी यात काहीच तरतूद करण्यात आली नाही. हे धोरण राबवताना मार्गात बरेच खाच खळगे, अडथळे आहेत. पण त्यावर आपल्यालाच पुढाकार घेऊन मार्ग काढावा लागेल.
प्रा. श्वेता नवलकर

अंगणवाडीत खाऊ मिळतो म्हणून पालक मुलांना अंगणवाडीत पाठवतात, तसे इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेत मुलांना रोबोट बनविण्यासाठी पालक पाठवितात. अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांशी सलग्न केल्यास फारच चांगले होईल. प्रस्तावित मसूदा स्वागतार्ह आहे.
राजेश पारेख

अंगणवाडी सारख्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये मुलांवर इतर सर्व विषयांचा ताण देण्यापेक्षा त्यांच्या मेंदूची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे तो पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी सक्षम होईल.
प्रा. चिन्मयी चुरी

परिषदेच्या शाळांमधून शिक्षणापेक्षा पटावर विद्यार्थ्यांची संख्या किती याला महत्व दिले जाते. याबाबत कागदोपत्री चित्र रंगविणे याला महत्व आहे. शिक्षकांनी व शिक्षण संस्थांनी साचेबंद शिक्षणाला पर्याय शोधला पाहिजे. जेष्ठ शिक्षकांना आधुनिक प्रणालीचे ज्ञान अवगत करून दिले पाहिजे. शिक्षकांनी उत्साहाने शिकवले तरच विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होईल.
दीपक पाटील

शालेय शिक्षणामध्ये मुलाचा 3 वर्षे वयाचा अंतर्भाव करण्याआधी त्या मुलाच्या मानसिकतेचाही विचार झाला पाहिजे. काही 6 वर्षाची मुले शाळेत जाताना रडतात. त्यामुळे लहान मुलांना बळजबरीने शाळेत पाठविले जाऊ नये!
मेधा मराठे

comments

About Rajtantra

Scroll To Top