दिनांक 24 February 2020 वेळ 7:48 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर

वाडा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर

  • तीनही आरोग्य पथकांना डॉक्टर नाहीत
  • प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस डॉक्टर्सची पदे रिक्त
  • रुग्णांचे हाल; रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी खाजगी दवाखान्यांचा आधार

प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा तालुका हा बहुसंख्येने आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका असून दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहचायला हवी म्हणून शासनाने येथे चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन आरोग्य पथकांची निर्मिती केली आहे. मात्र तालुक्यातील निंबवली, गारगाव व सोनाळे या तीनही आरोग्य पथकांमध्ये कित्येक महिन्यांपासून डॉक्टरच नाहीत. तर कुडुस, खानिवली व गोर्‍हे या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त असून परळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस डॉक्टर गेल्या महिनाभरापासून गैरहजर असल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच सलाईनवर असल्याची स्थिती बनली आहे.

केळठण येथील पांडू जाधव या आदिवासी व्यक्तीला सर्पदंश झाल्यानंतर निंबवली येथील आरोग्य पथकात डॉक्टर नसल्याने त्याला उपचारासाठी सुमारे 35 किलोमीटर अंतरावरील वाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतर आरोग्य यंत्रणेचा हा गलथान कारभार उजेडात आला आहे.

तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात पावसाळी हंगामात कुपोषण, बालमृत्यू, सर्पदंश यासह साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव मोठ्याप्रमाणावर होत असतो. अशा स्थितीत हे सरकारी दवाखाने डॉक्टरांअभावी माणसांना उपयोगी ठरत नसल्याने त्यांचे कोंडवाडे बनवावेत, अशी उद्विग्न टीका श्रमजीवी संघटनेने केली असून या दवाखान्यामध्ये प्रशासनाने तातडीने डॉक्टर नियुक्त केले नाहीत तर त्याविरोधात दवाखान्यात गुरे बांधण्याचे आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी दिला आहे.

मी शेतामध्ये काम करत असताना मला सर्पदंश झाला. निंबवली येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने मला उपचारार्थ वाडा येथे जाण्यास सांगितले. तेथे रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याने मला खाजगी वाहनातून वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-पांडुरंग जाधव, सर्पदंश झालेले रुग्ण

निंबवली प्राथमिक आरोग्य पथकात गेल्या मे महिन्यापासून डॉक्टर नसल्याने येथील रुग्णांना उपचारासाठी वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात किंवा इतरत्र खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. येत्या 15 तारखेपर्यंत या आरोग्य पथकात डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत तर या आरोग्य केंद्रात गुरे बांधण्याचे आंदोलन केले जाईल.
-विजय जाधव, श्रमजीवी संघटना

निंबवली प्राथमिक आरोग्य पथकाचे डॉक्टर दानिश मणियार यांनी कौटुंबिक कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त असून पर्यायी व्यवस्था म्हणून तालुक्यातील रेस्क्यू कँपच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना तिथे रुग्ण पाहणीसाठी पाठविण्यात येत आहे.
-आर. बी. ठाकरे, आरोग्य सहाय्यक, पंचायत समिती, वाडा

comments

About Rajtantra

Scroll To Top