दिनांक 24 February 2020 वेळ 8:24 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जव्हार व मोखाड्यातील विकास कामांचा पालकमत्र्यांनी घेतला आढावा

जव्हार व मोखाड्यातील विकास कामांचा पालकमत्र्यांनी घेतला आढावा

  • जव्हार तालुक्यात भात प्रक्रिया केंद्र सुरू करण्याबाबत प्रयत्न करावेत!
  • शेतकर्‍यांना मोठे करण्यासाठी योजनांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी!
  • पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 12 : शेतकरी मोठा झाला पाहिजे यासाठी शासन विविध महत्वाकांक्षी योजना राबवित आहे. पालघर जिल्ह्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, शासनाचा उद्देश सफल होण्यासाठी जव्हार तालुक्यातील भात खरेदीचे प्रमाण वाढविण्याबाबत संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्यमंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. जव्हार तालुक्यात भात प्रक्रिया केंद्र सुरू करण्याबाबत प्रयत्न व्हावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

पालकमंत्री चव्हाण सध्या पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असुन या दौर्‍यात ते सर्व तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेत आहेत. त्यानुसार जव्हार तालुक्यातील विकास कामांचा चव्हाण यांनी शुक्रवारी आढावा घेतला. आदिवासी विकास विभागाच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, आमदार पास्कल धनारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अजित कुंभार, अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्य शासन ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध महत्वकांक्षी योजना राबवित आहेत. विशेषतः शेतकरी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी या योजना अत्यंत उपयुक्त अशा आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना लाभार्थ्यांना या योजनांचे महत्त्व समजावून सांगावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.

ते म्हणाले, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी, कृषी विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना यांसह पाणीपुरवठा योजना, भात खरेदी केंद्र, वीज पुरवठा केंद्र अशा ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण योजना शासनामार्फत राबविण्यात येतात. या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तालुका कुपोषणमुक्त होण्यासाठी या प्रयत्नांमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. रायतळी येथे पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित गावांमधून विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करणे आणि त्यास वन विभागाची मान्यता ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजित चालतवड येथे जागा उपलब्ध होत नसल्याने बोराळे उपकेंद्र शेजारी जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कार्ड वाटप लवकर पूर्ण करून त्यांना या योजनेचे महत्त्व समजावून सांगावे, किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची माहिती तातडीने पूर्ण करावी, जातीच्या दाखल्याचे वाटप तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या.

दरम्यान, यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उभारण्यात आलेल्या आदिवासी कलाकृतींचे प्रदर्शनी दालन व विक्री केंद्र ट्राईब्ज पालघरचे उद्घाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पालकमंत्र्यांनी येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयास भेट देऊन खरोंडा येथील आईने विष दिल्यानंतर बचावलेल्या बालकाच्या प्रकृतीची विचारपूसही केली.
या दौर्‍याप्रसंगी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात पालकमंत्री चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

लक्ष्य निर्धारित करून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचवाव्यात!

शासन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून विविध योजना राबवित आहे. त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी लक्ष्य निर्धारित करून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी मोखाडा येथे केले. मोखाड्यातील पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत चव्हाण यांनी तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

चव्हाण यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणार्‍या ज्या योजना अपूर्ण आहेत त्या तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांसाठी उपयुक्त अशी शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. यामध्ये अद्यापही ज्यांची नावे समाविष्ट झालेली नाहीत त्याची कारणे शोधून तसेच ज्यांच्या सातबारावर खातेफोड झालेली नसेल ती शिबीर आयोजित करून आणि शेतकर्‍यांना या योजनेचे महत्त्व लक्षात आणून देऊन पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले. खोडाळा येथील 5 एमव्हीए वीज उपकेंद्राच्या प्रलंबित असलेल्या कामाविषयी माहिती घेऊन ते तातडीने पूर्ण होण्यासाठी महसूल आणि वन विभागाने मदत करण्याची सूचना त्यांनी केली. पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर असल्याने त्याबाबतही माहिती घेऊन या अंतर्गत प्रलंबित असणारी सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रलंबित सर्व कामांचे कार्यादेश तातडीने देऊन शासनाकडे प्रलंबित असणार्‍या विषयाबाबत आपण स्वतः पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top