बदली झालेल्या अभियंताच्या घरी सापडल्या महत्वाच्या फायली व शिक्के!

0
2

पालघर नगर परिषदेचा भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर

वार्ताहर/बोईसर, दि. 9 : पालघर नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीसाठी आलेली शेकडो प्रकरणे तसेच अनेक महत्वाच्या फाईली व नगरपरिषदेचे आवक-जावक शिक्के नगरपरिषदेच्या अलिकडेच बदली झालेल्या अभियंत्याच्या घरी सापडल्याने पालघर नगरपरिषदेचा भोंगळ व भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पालघर नगरपरिषदेमध्ये पूर्वी कार्यरत असलेले अभियंता भालचंद्र शिरसागर यांच्या पालघर नगरपरिषद हद्दीच्या बाहेरील व माहीम ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या कांचन पारिजात या खाजगी इमारतीतील सदनिकेत 300 हून अधिक महत्वाचे दस्तावेज, फायली, शिक्के तसेच संगणकामध्ये नगरपरिषदेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती ठेवली असल्याचे आढळून आले आहे. भालचंद्र शिरसागर यांची तीन महिन्यापूर्वी इतरत्र बदली झाल्यानंतर देखील ते अधून मधून पालघरमध्ये येत असत व जुने दस्तावेज तसेच प्रकरणांना त्यांच्या कार्यकाळातील पूर्व तारखेमध्ये परवानगी देत असल्याची चुणचुण नगरपरिषदेतील काही नगरसेवकांना लागली होती. त्यानुसार नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते भावानंद संखे, नगरसेवक अमोल पाटील व अरुण माने यांनी काल, गुरुवारी सायंकाळी अचानक सदनिकेच्या ठिकाणी धडक दिली. यावेळी तेथे काही वास्तुविशारद, विकासक व ठेकेदार आपल्या प्रलंबित प्रकरणांची चर्चा करत असल्याचे तसेच पालघर शहरातील गेल्या तीन-चार वर्षांतील महत्त्वाच्या बांधकाम प्रकल्पांसह जून 2019 या महिन्यातील बांधकाम परवानगी संदर्भातील महत्त्वपूर्ण दस्तावेज या ठिकाणी आढळले. विशेष म्हणजे यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दाखल केलेल्या दस्तावेजांचाही समावेश असून काही गहाळ झालेले महत्त्वपूर्ण दस्तावेज व फाईली याठिकाणी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

पालघर नगरपरिषद हद्दीमध्ये अनेक गृहनिर्माण प्रकल्प होऊ पाहत असून बांधकाम परवानग्या, भोगवटा धारण प्रमाणपत्र इत्यादी बाबींसाठी नगरपरिषदेकडून विकासकांची अडवणूक केली जात असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. त्यातच सदर प्रकार उघडकीस आल्याने नगरपरिषद कार्यालयाबाहेर प्रति कार्यालये स्थापन करून सर्व व्यवहार परस्पर करण्याचा हा प्रयत्न असल्याची शंका व्यक्त होत असुन नगरपरिषदेच्या कार्यालयात मुबलक जागा उपलब्ध असताना विकासकांची अडवणूक करून त्यांच्याकडून गैरमार्गाने पैसे उकळण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण दस्तावेज नगरपरिषदेच्या कार्यालयाबाहेर कोणत्याही परवानगीशिवाय नेले असल्याचा आरोप नगरसेवक तसेच नगराध्यक्षांनी केला आहे.

संबंधित अभियंता, बदली झालेले अभियंता तसेच मुख्याधिकारी व काही नगरसेवकांच्या संगनमताने हा कारभार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात असुन याप्रकरणी पालघरचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे, ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments