वाड्यातील मुख्य रस्त्याची चाळण

0
10

शुक्रवारपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु होणार?

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : वाडा ते परळी मार्गे देवगाव या रस्त्याचे नूतनीकरण झाले असून यात वाडा शहरातील मुख्य रस्त्याचाही समावेश आहे. मात्र या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम रखडल्याने ते पावसाळा आला तरी होऊ शकले नाही. परिणामी पावसाच्या आगमनाने शहरातील या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन वाहनचालक, पादचार्‍यांसह विद्यार्थ्यांना या मार्गावरून वाट काढणे जिकरीचे झाले आहे. तसेच वाहनांचे लहानसहान अपघात, विद्यार्थी व लोकांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे, असे प्रकार येथे नित्याचेच झाले आहेत.

शहरातून जाणार्‍या या मार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम प्रस्तावित असून खरंतर ही कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या टोलवाटोलवीने हे काम आजवर रखडले आहे. अशा परिस्थितीत खराब झालेल्या या रस्त्याची किमान मलमपट्टी तरी होणे गरजेचे होते. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले गेल्याने आज वाडा शहरातील रस्त्यावर पाय ठेवणे जिकरीचे झाले असून वाहतूक कोंडीची समस्या देखील भीषण रूप घेत आहे.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जेरिस आलेल्या येथील नागरीकांनी रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण जेव्हा हाईल तेव्हा होईल, मात्र तत्पूर्वी रस्त्यावरील खड्डे तरी बुजवावे, अशी मागणी केली आहे.

शहरातील रस्त्याच्या कामाची आज पातळी निश्‍चित करण्याचे काम सुरू असून उद्या, शुक्रवारपासून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू होईल. शिवाय खड्डे भरण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत.
-चंद्रकांत पाटील,
उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा

Print Friendly, PDF & Email

comments