दिनांक 26 May 2020 वेळ 9:41 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यातील गारगाई धरणाला मुंबई महापालिकेचा अग्रक्रम

वाड्यातील गारगाई धरणाला मुंबई महापालिकेचा अग्रक्रम

 • पुनर्वसनाकरिता मोठ्या पॅकेजची तरतूद
 • विस्थापितांचे वाडा तालुक्यातच पुनर्वसन

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : मुंबई शहराची वाढती तहान भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई व पिंजाळ धरणांपैकी मुंबई महापालिकेने गारगाई धरणाला अग्रक्रम दिला असून या प्रकल्पामधील विस्थापितांकरिता नोकरीसह लाखो रुपयांचे पॅकेज महापालिका देणार असल्याचे नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व धरणामुळे विस्थापित होणार्‍या ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांगण्यात आले. राज्यात विविध प्रकल्पांना प्रकल्प बाधितांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन महापालिकेने प्रकल्पग्रस्तांचे समाधान करण्यावर भर दिला असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई शहराकरिता भविष्यात पाण्याचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा भासू शकतो. दरवर्षीच्या पावसाच्या अनियमिततेमुळे पाणी कपातीचे संकट महापालिकेवर ओढवत असते. त्यामुळे गत तीस वर्षापूर्वीपासून प्रस्तावित असलेल्या गारगाई आणि पिंजाळ धरणाच्या प्रकाल्पांचे महत्व वाढले आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर युद्धपातळीवर या प्रकल्पांबाबत प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी मागील आठवड्यात महापालिकेच्या अधिकार्‍यांसह पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे आणि अन्य अधिकार्‍यांसोबत मोडकसागर धरणावरील विश्राम गृहात महत्वाची बैठक घेत गारगाई प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे सूतोवाच केले होते.

गारगाई प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदा, तीळमाळ, खोडदे, फणसगाव आणि मोखाडा तालुक्यातील आमले ही महसुली गावे बाधित होत असून सुमारे सहाशेहून अधिक आदिवासी कुटुंब विस्थापित होत आहेत. ही गावे वनक्षेत्रातील असल्याने त्यांचे पुनर्वसन वाडा तालुक्यातच करावे अशी प्रकल्प बाधितांची मागणी असल्याने त्यांचे पुनर्वसन तालुक्यातील वनक्षेत्रातच करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्याकरिता वाडा तालुक्यात वनविभागाकडील जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी नारनवरे यांनी प्रकल्प बाधितांसोबत वाड्यात एक बैठक घेऊन देवळी गावालगतच्या सुमारे सहाशे हेक्टर क्षेत्र असलेल्या वनजमिनीची पाहणी केली. ही जमीन प्रकल्पग्रस्त नागरिकांनीही पसंत केल्याने या जागेत पुनर्वसन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

प्रकल्पांना होणारा विरोध लक्षात घेऊन महापालिकेचे आयुक्त परदेशींनी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेत नोकरी, नुकसान भरपाई म्हणून घरासाठी 10 लाख रुपये, नावे असलेल्या जमिनीच्या बदल्यात जमिनीबरोबरच शासकीय बाजारमूल्याच्या चार पट दराने रक्कम, 18 वर्ष वयोगटाखालील मुलांच्या नावे 15 लाख रुपयांची मुदतठेव, असे घवघवीत पॅकेज ठेवल्याने या प्रकल्पास कोणतीही बाधा न येता कित्येक वर्ष चर्चेत असलेला गारगाई प्रकल्प अल्पावधीतच मार्गी लागेल अशी चिन्हे आहेत.

आम्हा प्रकल्प बाधित ग्रामस्थांना पुनर्वसन म्हणून दिला जाणारा मोबदला, वाडा शहरानजीक दिली जाणारी वनजमिन या सर्व गोष्टी समाधानकारक असून लवकरच आमच्या गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण होणार असून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत.
-गणपत दोडे, माजी सरपंच व प्रकल्पबाधीत

 • पुनर्वसन मोबदल्यातील ठळक बाबी
  1) कुटुंबाला 10 लाख
  2) कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी
  3) प्रत्येक कुटुंबाला अडीच हेक्टर जमीन
  4) भूमिहीन कुटुंबाला 1 हेक्टर जमीन
  5) नोकरी नको असलेल्या कुटुंबाला एक रक्कमी 5 लाख अथवा वीस वर्षापर्यंत पेंशन योजना
  6) स्थावर मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार मोबदला
  7) जमिनीची शासकीय बाजारमूल्याच्या चौपट दराने खरेदी
  8) जमीन खरेदीच्या बाजारमूल्याच्या 25 टक्के रक्कम अधिक बोनस
  9) एका वर्षासाठी निर्वाह भत्ता 30 हजार
  10) पुनर्वसनासाठी वाहतूक भत्ता 50 हजार
  11) गुरांचे गोठे, दुकान यासाठी 25 हजार
  12) ग्रामीण कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी 25 हजार
  13) पुनर्वसन भत्ता 50 हजार
  14) 18 वर्षाखालील मुलांच्या भविष्यासाठी 15 लाख बँक खात्यात ठेवणार
 • पुनर्वसनाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती
  1) प्राथमिक आरोग्य केंद्र
  2) शेतीसाठी सिंचन योजना व स्वतंत्र पाणी योजना
  3) या सिंचन योजनेच्या पाणी योजनेचे पाणी व वीज कर पुढील 20 वर्ष महापालिका भरणार
  4) रस्ते
  5) गुरांसाठी कुरण
  6) रेशन दुकान
  7) पोस्ट ऑफिस
  8) शाळा
  9) अंगणवाडी
  10) मंदिर, समाजमंदिर
  11) क्रीडांगण
  12) व्यायामशाळा
  13) पथदिवे
  14) पशू वैद्यकीय दवाखाना
  15) स्मशानभूमी

comments

About Rajtantra

Scroll To Top