दिनांक 25 May 2020 वेळ 1:19 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाड्यात धुवाधार पाऊस, मोखाडा-त्र्यंबकेश्वर रास्ता गेला वाहून

मोखाड्यात धुवाधार पाऊस, मोखाडा-त्र्यंबकेश्वर रास्ता गेला वाहून

दीपक गायकवाड /मोखाडा, दि. 11 : येथे मागील काही दिवसांपासुन संततधार कोसळणार्‍या पावसाने काल, बुधवार रात्रीपासुन उग्ररुप धारण केले असून दाणादाण उडवून दिली आहे. मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावरील मोरचुंडी येथील नदीला पुर आल्याने पुराच्या पाण्यात मोरचुंडी पुलाच्या बाजुचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असुन मोखाड्याचा नाशिकशी संपर्क तुटला आहे. तर दुसरीकडे तोंरगण घाटात झाडे तुटून व खोडाळा-मोखाडा रस्त्यावरील गांधीपुल मंदिराजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने या रस्त्यांवरील वाहतूक देखील बंद आहे. मोरचुंडी परिसरातील नद्यांना पुर आल्याने आसपासची घरे व शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरुन रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. दरम्यान, मोखाडा तालुक्यात काल, सकाळी 9 वाजेपर्यंत 113 मिमी पावसाची नोंद झाली असुन मुसळधार कोसणार्‍या या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आमला गावाचा संपर्क तुटला

मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम आणि तिन्ही बाजूने नदीने वेढलेल्या आमला गावाचा काल झालेल्या मुसळधार पावसाने संपर्क तुटलेला आहे. मुख्य रस्त्यापासून आमला गावाला जोडणार लोखंडी पूल मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने वाहून गेला आहे.

जवळपास 300 लोकवस्ती असलेलं आमला गाव हे एका बाजूने डोंगर तर तिन्ही बाजूने नदीने वेढलेलं आहे. हमरस्त्यापासून या गावात पोहोचण्यासाठी वनविभागाने या नदीवर अरूंद लोखंडी साकाव बांधलेला होता. परंतु या साकावचे लोखंडी खांब (पिलर) गंज लागल्याने जिर्ण झाले होते. त्यातच कालच्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रवाह वाढल्याने हा साकाव समूळ वाहून नेला आहे.

मोगरा व भातशेतीचे प्रचंड नुकसान
कालच्या मुसळधार पावसाने येथील शेतकर्‍यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. भात शेती वाहून गेल्याने दिलीप लहू वारे, मंगळु गांगड व संतोष पादीर या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या गावातील 40 कूटुंंब गेल्या 3-4 वर्षांपासुन मोगरा शेतीमधुन उत्पादन घेऊन कूटुंब चालवत आहेत. मात्र कालच्या पावसात 8 शेतकर्‍यांच्या मोगरा लागवड केलेल्या शेतातुन पुराचे पाणी गेल्याने संपुर्ण मोगरा शेती वाहुन गेली. यामध्ये राजु बार्हात, पांडु धवळू वारे, सोमनाथ किरकीरे, संजय किरकीरे, विष्णु किरकीरे, गौरव किरकीरे, लक्ष्मण किरकीरे व राजु वारे या 8 शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मध्यवैतरणा ते विहीगांव रस्ता वाहून जाण्याच्या मार्गावर

मध्यवैतरणा पुलापासून पुढे विहीगांव रस्त्यावर डोंगरमाथ्यावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने व त्यातच मोबाईल कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यालगतच्या साईडपट्ट्या उखडून गेल्यामुळे संरक्षक भिंती तुटून हा रस्ता कधीही वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोखाडा – खोडाळा आणि खोडाळा ते विहीगांव रस्त्यावर पाणी निचरा व्यवस्थापन नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहते आहे. त्यातच खोडाळा ते विहीगांव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय आहे. डाव्या बाजूला खडा पहाड तर उजव्या बाजूला हजारो फुट खोल दरी येथे आहे. या रस्त्यावर तुरळक संरक्षक भिंती वगळल्यास इतर कुठेही धोकादायक ठिकाणांवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मध्यवैतरणा पुलाच्या अगदी खेटून बांधलेल्या संरक्षक भिंतीच्या साईडपट्टीमध्ये मोबाईलची केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथील भराव मोकळा झाल्याने डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी या साईडपट्टीतून वाहत असल्याने लगतची संरक्षक भिंत कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होणाच्या स्थितीत आहे. अशीच परिस्थिती इतरही अनेक ठिकाणी असल्याने येथील रस्त्यांना खालून भगदाड पडण्याची शक्यता असून या रस्त्यांवरील वाहतुकही बंद होण्याची दाट शक्यता आहे.

खोडाळा ते मध्यवैतरणा पुलाच्या अलीकडील रस्ता हा मोखाडा सार्वजनिक बांधकाम उप विभाग तर त्यापुढील रस्ता ठाणे जिल्ह्यातील शहापूर उपविभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या रस्त्याच्या दुरवस्थेत अधिकच भर पडत आहे.

याबाबत शहापूर उपविभागाशी संपर्क साधला असता आमच्याकडे मैल बिगारी कमी असुन विस्तारीत क्षेत्रामुळे सर्व ठिकाणी मैल बिगारी पाठवता येत नसल्याने यंत्राच्या माध्यमातून गटारी काढल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच याठिकाणी अडीच कोटी रूपयांचा निधी रॉक कटींग व संरक्षक भिंतीसाठी मंजूर असुन पावसाळ्यानंतर काम सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले.

संबंधित मोबाईल कंपनीविरुद्ध तक्रार
मोखाडा तालुक्यातील बहूतांश ठिकाणच्या रस्त्यांच्या दुरवस्थेला मोबाईल कंपन्यांनी आपल्या केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदाईचे कामच कारणीभूत असून मोखाडा तहसिलदारांनी संबंधित मोबाईल कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मोखाड्याचे सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top