- भिवंडी-वाडा रस्त्याची दुरावस्था
- बांधकाम विभाग आणि सुप्रीम कंपनीचे दुर्लक्ष

प्रतिनिधी/वाडा, दि. 9 : वाडा- भिवंडी महामार्गावर पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे असुन महामार्ग धोकादायक बनला आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाही ठेकेदार कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
वाडा-भिवंडी हा महामार्ग केवळ नावापुरता शिल्लक असून महामार्गासारखा एकही गुण या रस्त्यात नाही. पहिल्या पावसातच या महामार्गावर जागोजागी असंख्य खड्डे पडले असून अनेक ठिकाणी हे खड्डे दोन ते तिन फुटांनी खोल झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे पाण्याने भरत असल्याने अनेकवेळा वाहनचालकांच्या लक्षात ते येत नसल्याने भविष्यात मोठ्या अपघात घडण्याची शक्यता नकारता येत नाही.
भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या अपुर्ण आणि निकृष्ट कामामुळे आजपर्यंत शेकडो नागरिकांचे बळी गेले आहेत. मात्र आजपर्यंत या रस्त्याचा दर्जा उत्तम करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. एखाद्या पक्षीय आंदोलनानंतर रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते व त्यानंतर काही दिवसातच रस्त्याची अवस्था जैसै थे होते. वाडा- भिवंडी-मनोर महामार्गावर वाहतुकीचा रेटा लक्षात घेता तत्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.
वाडा-भिवंडी-मनोर हा महामार्ग बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर सरकारने सुप्रीम कंपनीला दिला आहे. पाच वर्षांपूर्वीच कंपनीने हा रस्ता बनविला होता. मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने हा संपुर्ण रस्ताच खड्ड्यात गेला आहे. या रस्त्यासाठी टोल आकारला जात असताना देखील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वाहनचाकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
यासंदर्भात सुप्रीम कंपनीचे अधिकारी झेड. एन. शेख यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वाड्यात प्रशिक्षण मेळावा
- अन्नदिनाचे ओझे शिक्षकांच्या खांद्यावर
- तलासरी : दरोड्यातील आरोपींना पाच वर्षांची शिक्षा
- अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आणखी एका आरोपीला कारावास
- राष्ट्रवादीला खंबीर नेतृत्वाची गरज; रेखाताई पष्टेंना विधान परिषद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी