दिनांक 20 February 2020 वेळ 9:54 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात युवासेना छेडणार आंदोलन

महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात युवासेना छेडणार आंदोलन

  • देखभाल दुरूस्तीचा अभाव
  • खोडाळा विभाग अंधारात

दीपक गायकवाड/ मोखाडा, दि. 8 : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने तालुक्यात महावितरणच्या ढिसाळ कारभारावर टिका होत आहे. खोडाळा विभागातही सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने तसेच अनेकवेळा तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक झालेल्या युवासेनेने याविरोधात व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मोखाडा तालुक्यात चालू वर्षी सर्वत्र महावितरणच्या गलथान कारभाराबाबत तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. त्यातच खोडाळा विभागातील पंचक्रोशीत तर पावसाळा सुरू झाल्यापासून एकही दिवस विद्युत पुरवठा सुरळीत राहिलेला नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरण त्याची कोणतीही दखल घेत नाही. मान्सून पूर्व दुरूस्तीच्या कामातही कमालीची हेळसांड झालेली असुन विद्यूत वाहिन्यांच्या दुरूस्तीबाबत बेपर्वाई झालेली आहे. हलकासा वारा आला तरी लगेच विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग, बँका, रुग्णालये तसेच शाळा, महाविद्यालयांना त्याचा फटका बसत असून नैमित्तिक कामांमध्ये अडथळा येत आहे. मात्र तरीही महावितरणला जाग येत नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे युवासेनेचे विक्रमगड गटसमन्वयक राहूल कदम यांनी सांगितले.

मोखाडा तालुक्यात 1970 च्या दशकात वीज पोहोचली आहे. मात्र त्यानंतर आजतागायत त्यावर किरकोळ डागडुजी व्यतिरिक्त कोणतीही देखभाल दुरूस्ती करण्यात आलेली नाही. वास्तविकतः वीजमंडळाचे खाजगीकरण झाल्यानंतर त्यात आवश्यकतेप्रमाणे नुतनीकरण करणे अपेक्षित होते. परंतु महामंडळापेक्षाही महावितरण धिम्या गतीने आणि बेफिकीरीने वागत असल्याने तालुक्यातून तीव्र असंतोष झळकताना दिसत आहे.

महवितरणचा जावई शोध
मान्सूनपूर्व दुरूस्तीपैकी विद्युत वाहिन्यांलगतची झाडे तोडणे, गंजलेले खांब, रोहीत्र तपासणे आदी कामे पावसाळ्यापुर्वीच अर्थात मे महिन्यातच करणे गरजेचे असताना मोखाड्यात मात्र ही कामे जुलैच्या मध्यावर करण्याचा नवीनच जावई शोध महावितरणने लावला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महिलामंडळही सरसावणार
आगामी दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत आणि अखंड न झाल्यास येत्या सोमवारी (दि.15) महावितरणचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी खोडाळा चौफूलीवर रास्तारोको आंदोलन करण्याचे युवासेनेने जाहिर केले असून महिलामंडळही त्यात बहूसंख्येने सामिल होणार असल्याचे युवासेनेतर्फे सांगण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top